पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये जातीय दंगलीत (Manipur Violence) २४ तासांत १० जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्कर आणि निमलष्करी दलांनी आतापर्यंत २५ हल्लेखोरांना पकडले आहे. त्यांच्याकडून शस्त्रे, दारूगोळा जप्त करून त्यांना मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. राज्यात सुरू असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी राष्ट्रपती राजवट तातडीने लागू करण्याची मागणी तेथील एका जमातीच्या गटाने केली आहे.
संरक्षण दलाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, इम्फाळ खोऱ्यात आणि परिसरात गोळीबार आणि चकमकींच्या घटनांनंतर अनेकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "इम्फाळ पूर्वेतील संसाबी, ग्वालताबी, शबुनखोल, खुनाओ येथे कारवाईदरम्यान लष्कराने २२ हल्लेखोरांना पकडले. त्यांच्याकडून शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त केले. १२ बोअरच्या पाच डबल बॅरल रायफल, तीन सिंगल बॅरल रायफल यासह अन्य शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. रविवारी झालेल्या हिंसाचारात सुरक्षा दलाच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत आतापर्यंत कुकी आदिवासी समुदायाचे सुमारे ४० अतिरेकी मारले गेले आहेत.
पुन्हा हिंसाचार उसळला
मैतेई समुदायाला अनुसूचित जमाती (एसटी) चा दर्जा मिळावा या मागणीच्या विरोधात ३ मे रोजी पर्वतीय जिल्ह्यांध्ये 'आदिवासी एकजुट मार्च' आयोजित केला होता. यानंतर मणिपुरमध्ये जातीय संघर्षात (Manipur Violence) ७५ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे ५३ टक्के मैतेई इंफाळ खोऱ्यात राहतात. राज्यातील सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी अर्धसैनिक दलांव्यतिरिक्त, लष्कर आणि आसाम रायफल्सच्या सुमारे १४० तुकड्या तैनात कराव्या लागल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ आणि २८ मेच्या रात्री हिंसाचार उसळल्यानंतर पुन्हा एकदा हल्लेखोर सक्रिय झाले आहेत. सोमवारी १०० हून अधिक लोक इंफाळ पूर्वेतील ७ व्या बटालियन मणिपूर रायफल्सच्या गेटवर जमले. मात्र, लष्कराने या लोकांना पांगवले. त्याचवेळी पोरोम्पत पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने लोक जमा झाले आणि त्यांनी शस्त्रे घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी प्रत्युत्तर देत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले. हिंसाचाराच्या वेळी सुरक्षा जवानांनी अनेक ठिकाणांहून शस्त्रे जप्त केली आहेत. सोमवारी दुपारी इंफाळ पश्चिम येथील इंगोरोक चिंगमुंग येथे गोळीबार झाला.
हेही वाचा :