हिटलरचे जन्मस्थळ पाडण्यात अखेर ऑस्ट्रिया अपयशी! | पुढारी

हिटलरचे जन्मस्थळ पाडण्यात अखेर ऑस्ट्रिया अपयशी!

व्हिएन्ना, वृत्तसंस्था : व्हिएन्नापासून 254 कि.मी.वरील ब्राऊनाऊ अ‍ॅम इन या ऑस्ट्रियातील शहरामधील अ‍ॅडॉल्फ हिटलर याचे जन्मस्थळ असलेले घर पाडण्यात ऑस्ट्रिया सरकार अखेर अपयशी ठरले आहे. आता या घराचे पोलिस ठाणे होणार आहे. जगावर दुसरे महायुद्ध लादून तसेच ज्यूंना (यहुदी) गॅस चेम्बरमध्ये कोंडून लक्षावधींची प्राणहानी घडविणार्‍या नाझी हुकूमशहाच्या या जन्मस्थळी आता पोलिसांना मानवाधिकाराच्या मूल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, हे विशेष!

ब्राऊनाऊ अ‍ॅम इन शहर जर्मन सीमेला अगदी लागून आहे. येथेच 20 एप्रिल 1889 रोजी हिटलरचा जन्म झाला होता. वयाच्या तिसर्‍या वर्षापर्यंतच हिटलर या घरात राहिला. हिटलरचे आई-वडील पुढे नव्या घरात गेले. याउपर दुसर्‍या महायुद्धात नाझींनी या घराला एक धार्मिक स्थळ बनवून टाकले, पुढेही जणू याच ठिकाणी हिटलर नावाचा एक अवतार किंवा प्रेषित जन्मलाय, या भावनेतून नाझीवादी या घराचे दर्शन घेण्यासाठी येत राहिले.

हिटलरचे उदात्तीकरण घातक ठरू शकते म्हणून ऑस्ट्रिया सरकारने हे घर पाडण्याचे ठरविले; पण त्यावरून वाद उद्भवला. मग 2016 मध्ये या घराबाबत निर्णयासाठी सरकारने एक समिती स्थापन केली होती. समितीनेही घर पाडावेच, असा निष्कर्ष काढला. हिटलरचा जन्म ही ऑस्ट्रियात घडलेली एक ऐतिहासिक घटना आहे आणि हे घर पाडले तर या घटनेचा इतिहास पुसला जाईल, असे अनेक बडे नेते आणि तज्ज्ञांचे म्हणणे पडले.

1889 या घरात हिटलरचा जन्म

* 1972 पासून मूळ मालकाकडून हे घर सरकारने भाड्याने घेतलेले होते. अपंग पुनर्वसन केंद्र त्यात चालवले जात असे.
* 2011 मध्ये हे अपंग केंद्र बंद झाले होते. इथे मग पुन्हा हिटलर समर्थक जमू लागले. सरकारला ही धोक्याची खूण वाटू लागली.
* 2016 मध्ये नाझीवाद जेवणात मिठाएवढाही नको म्हणून ते घरच पाडून टाकावे म्हणून सरकारने हे घर मूळ मालकाकडून 7 कोटी रुपयांत विकत घेऊन टाकले.
* 2017 सरकारने हे घर पाडू नये, या भूमिकेवर लोक कायम राहिले. अखेर आता येथे पोलिस ठाणे सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.
* 2025 पर्यंत पोलिसांचे कामकाज या घरात सुरू होईल.

Back to top button