

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत तसेच, स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला सादर न केलेल्या सर्व होर्डिंगवर कारवाई केली जात आहे. तसेच, संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. छोटा व मोठा असा कोणताही भेद न करता दोषी जाहिरात एजन्सी तसेच, परवाना निरीक्षकांवर सरसकट कारवाई केली जाणार आहे. त्यातून कोणी वाचणार नाही. पंधरा दिवसांनंतर शहरात एकही अनधिकृत व विनापरवाना होर्डिंग दिसणार नाही, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि.2) स्पष्ट केले.
किवळे येथे जाहिरात होर्डिंग कोसळून 5 जणांचा मृत्यू तर, 3 जण गंभीर जखमी झाले. ही घटना 17 एप्रिलला घडली. त्यानंतर परवानाधारक व अनधिकृत होर्डिंगचालक व मालकांना पालिकेने नोटीसा देत स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. कारवाईसाठी परवानाधारक होर्डिंग, न्यायालयात प्रकरण असलेले होर्डिंग व कोणतीही परवानगी न घेता उभारलेले होर्डिंग असे तीन गट करण्यात आले आहेत. प्रथम विनापरवाना उभे केलेले होर्डिग तोडण्यात आले आहेत. त्यानंतर न्यायालयात गेलेल्या 16 होर्डिंगचालकांनी दाखला न दिल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तसेच, दाखला न दिलेल्या परवानाधारक होर्डिंगवरही कारवाई सुरू आहे.
दाखला दिल्यानंतरही उंची, अधिक आकाराचे, धोकादायक, दुहेरी बाजूचे, चौकातील असा नियमात बसत नसलेले होर्डिंग पाडण्यात येणार आहेत. येत्या 15 दिवसांत ही कारवाई पूर्ण करण्यात येणार आहे. त्यात मोठे व छोटे जाहिरात एजन्सी असा भेद केला जाणार नाही. कारवाई पूर्ण झाल्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. कारवाईस हयगय करणार्या परवाना निरीक्षकांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. शहरात या पुढे अनधिकृत व विनापरवाना एकाही हार्डिंग दिसणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: