

नगर, पुढारी वृत्तसेवा: माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वादळी सर्वसाधारण सभेनंतर पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. सत्ताधारी मंडळाचे नेते भाऊसाहेब कचरे हे सेवानिवृत्त झाले आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी झालेल्या मासिक बैठकीत सत्ताधारी संचालकांनी बहुमताने कचरे यांची तज्ज्ञ संचालकपदी निवड केली आहे. विरोधी परिवर्तन मंडळाने या निवडीला विरोध दर्शवला असून, कचरे यांची ही निवड नियमबाह्य असून ती रद्द करावी, या मागणीसाठी परिवर्तन मंडळाचे संचालक व सभासदांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर घोषणाबाजी व निदर्शने केली.
जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या मागील संचालक सभेमध्ये सेवानिवृत्तीनंतरही भाऊसाहेब कचरे यांची तज्ज्ञ संचालक म्हणून नियुक्ती केली. सोसायटीच्या घटनेमध्ये ज्या दिवशी शिक्षक निवृत्त होतो, त्या दिवशी त्याचे सभासदत्व रद्दचा नियम आहे. मात्र कचरे यांनी पदाच्या माध्यमातून अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करण्यासाठी तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती करून घेतल्याचा आरोप संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, सभासद बद्रिनाथ शिंदे, बाळासाहेब निवडुंगे, संतोष ठाणगे, प्रसाद साठे, अर्जुन भुजबळ, अभय जावळे, दिलीप बोठे, राहुल झावरे, भाऊसाहेब जिवडे, नंदकुमार शितोळे, राजेंद्र कोतकर, शिरीष टेकाडे आदींनी केला. मागणीचे निवेदन अधीक्षक टी.ए. थोरवे यांना देण्यात आले.
सत्ताधारी संचालकांच्या मते कचरे हे अनुभवी आहेत. त्यांच्या अनुभवाचा संस्थेला फायदा मिळावा, यासाठीच सर्वानुमते त्यांची तज्ज्ञ संचालकपदी निवड केली आहे.ही निवड करताना नियमांचा आधार घेतला असून, तज्ज्ञ संचालक निवडीसाठी सभासदाची अट नसते, याचे विरोधकांना ज्ञान नसल्याचाही टोला लगावला..
काही संचालकांना हाताशी धरून कचरे यांनी तज्ज्ञ संचालकपदी निवड करून घेतली. मात्र, त्यांचे सभासदत्व रद्द झाल्याने ही निवड बेकायदेशीर आहे. सहकार विभागाकडे निवड रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रसंगी आमची कोर्टात जाण्याची आमची तयारी आहे.
– अप्पासाहेब शिंदे, संचालक, परिवर्तन मंडळ.24 वर्षांपासून संचालक पद भूषविले आहे. अनेक चांगल्या निर्णयातून संस्थेचा चेहरा मोहरा बदलला आहे. माझ्या अनुभवाचा आणखी फायदा व्हावा, यासाठी संचालकांनीच तज्ज्ञ संचालकपदी निवड केली. 97 व्या घटना दुरुस्तीनुसार ती कायदेशीरच आहे.
– भाऊसाहेब कचरे, ज्येष्ठ संचालक.