

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा:
श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथील शेतकरी सधन कुटुंबातील एका तरुणाचा सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम 2 लाख 41 हजार रुपये घेऊन वर्धा जिल्ह्यातील काजल श्रीवास्तव हिच्याशी बनाबट विवाह लावण्यात आला होता. दि. 9 रोजी पहाटे ही नवविवाहिता पळून जात असताना नवरदेव व नातेवाईकांनी महिला व अन्य एकास पकडून श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काजल अनिल श्रीवास्तव (वर्धा), अजित पाटील, (कात्री, महाराष्ट्र), बळीराम नलबले (रा. लोहा, नांदेड), माधव सवणे, दिगंबर आंबूरे, (माळबोरगाव, किनवट, नांदेड), अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोपर्डी (ता. कर्जत, जि. नगर) येथील एजंट व हिंगणघाट (वर्धा) येथील चौकडीने मिळून भानगाव (ता. श्रीगोंदा) येथील मुलाचे लग्न 2 लाख 41 हजार रुपये घेऊन बनावट नवरी बबलीबरोबर लावण्याचे ठरविले. दि. 6 जून रोजी मुहूर्त काढला. नवरदेवाने मुलीला सोन्या चांदीचे अडीच लाखांचे दागिने, भरजरी कपडे घेऊन थाटामाटात लग्न केले.
गुरूवार, दि. 9 रोजी नवरदेवाच्या घरातील सर्व झोपेत असताना नवरी गाशा गुंडाळून पळून जाण्यासाठी गावातील पोही फाट्यावर आली. आरोपी अजित पाटील कार घेऊन तिची वाटच पाहात होता. तेवढ्यात नवरदेवाच्या नातेवाईकांनी त्या दोघांना पकडले. वाहन चालक पसार झाला. नवरदेवाच्या नातेवाईकांनी त्या दोघांना पोलिसांच्या हवाली केले.
संबंधित नवरीकडे अनेक बनावट आधारकार्ड आढळले. या टोळक्याने आतापर्यंत किती जणांना गंडा घातला हे पोलिसांच्या सखोल चौकशी नंतरच उघड होणार आहे. फसवणूक झाल्याचे समजताच नवरदेवाने श्रीगोंदा पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. या पाच आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मोठे 'नेटवर्क'
ग्रामीण भागातील नवरदेवशी लग्न करण्यास मुली तयार होत नसल्याने नवरदेवांना नवरी मिळवण्यासाठी परजिल्ह्यात धाव घ्यावी लागते. नेमका याच गोष्टीचा फायदा घेत मध्यस्त मंडळी तरुणांची फसवणूक करत आहेत. फसवणूक करणार्यांचे मोठे नेटवर्क सक्रिय आहे. श्रीगोंदा पोलिस ठाण्यात यापूर्वीही असाच एक गुन्हा दाखल आहे.