नाट्यगृहांच्या उत्पन्नाची गाडी रुळावर, शनिवार, रविवार बुकिंग फुल; इतर दिवशीही कार्यक्रमांची रेलचेल

नाट्यगृहांच्या उत्पन्नाची गाडी रुळावर, शनिवार, रविवार बुकिंग फुल; इतर दिवशीही कार्यक्रमांची रेलचेल
Published on
Updated on

वर्षा कांबळे

पिंपरी : कोरोनाकाळात दीड वर्ष बंद असलेल्या नाट्यगृहांचे उत्पन्न बुडाले होते. सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्यानंतरही नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. शासनाने परवानगी दिल्यानंतर जाचक अटी आणि नियमांमुळे फारसे कार्यक्रम होत नव्हते; मात्र आता सर्व काही सुरळीत झाल्यामुळे शनिवार व रविवार नाट्यगृहाचे बुकिंग फुल होत आहे; तसेच इतर दिवशीही कार्यक्रमांचा प्रतिसाद असल्याने नाट्यगृहांच्या उत्पन्नाची गाडी हळहळू रूळावर येत आहे.

शहरात पिंपरीचे आचार्य अत्रे रंगमंदीर, चिंचवडचे प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, भोसरीचे कै. अंकुशराव लांडगे सभागृह, पिंपळे गुरवचे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह अशी चार नाट्यगृहे आहेत. सध्या प्रा. मोरे प्रेक्षागृह आणि नटसम्राट फुले नाट्यगृहांत कार्यक्रमांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. तर लांडगे सभागृह व अत्रे रंगमंदिर याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमास प्रतिसाद मिळत आहे. नाटकांना 5 हजार 500 रुपये इतके भाडे आकारले जात आहे. तर सार्वजनिक कार्यक्रमांना तीन तासांसाठी 10 हजार 500 इतके भाडे आकारले जात आहेत. यामध्ये प्रा. मोरे प्रेक्षागृहाच्या सर्व तारखांचे बुकिंग फुल झाले आहे. इतर नाट्यगृहांमध्ये महिन्याला 15 ते 16 कार्यक्रम होत आहेत.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह हे चिंचवड येथे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सर्वांच्या सोयीचे आहे. महिन्याला साधारणत: 2 ते अडीच लाख रूपयांचे उत्पन्न कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळते. पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. याचे उत्पन्न साधारणत: लाख रूपये एवढे मिळते. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात नाटकांना जास्त प्रतिसाद नसतो. त्यामुळे याठिकाणी फक्त सांस्कृतिक कार्यक्रम, कंपन्यांचे मेळावे आयोजित केले जातात. तसेच नटसम्राट निळु फुले नाट्यगृहांमध्ये सद्यस्थितीमध्ये शनिवार आणि रविवार नाटकांचे प्रयोग होत आहेत. मध्यवर्ती ठिकाण नसले तरी याठिकाणी नाटकांना रसिकांचा प्रतिसाद वाढत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नाट्यगृहे ही शेवटच्या टप्प्यात सुरु करण्यात आली. यामध्ये ती 50 टक्के क्षमेतेनुसार सुरु करण्यास परवानगी मिळाली. त्यामुळे नाट्यसंस्था नाट्यप्रयोग करण्यास पुढे आल्या नाहीत. त्यामुळे निर्बंध हटविल्यानंतर सुरुवातीच्या काळात नाटकांचे बुकिंग होत नव्हते. कारण नाट्यसंस्थांना 50 टक्के क्षमतेने प्रयोग करणे परवडत नव्हते. आता सर्व परिस्थिती आटोक्यात आल्याने नाट्यसंस्था मोठ्या कलाकारांचे प्रयोग लावण्यास पुढे येत आहेत.

आता निर्बध हटविल्याने शंभर टक्के आसन क्षमतेने नाट्यगृहे सुरु आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बुकिंग देखील वाढले आहे. नवीन नाटकांचेही प्रयोग शहरात होत आहेत.
-गौरी लोंढे, संस्थापिका, आयाम नाट्यसंस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news