

बारामती, पुढारी वृत्तसेवा : नितिशकुमार यांना बिहारमध्ये लोकमान्यता आहे. महाराष्ट्रातील चित्र बिहारमध्ये दिसेल असे वाटल्यानेच नितीश कुमार यांनी सावध होत भाजपपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. नितीश कुमार यांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असेही पवार म्हणाले.
बारामतीत बुधवारी (दि. १०) ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, भाजप आपल्या मित्रपक्षांना निवडणूकीला सोबत घेऊन निवडणूक लढतात. पण दुसरीकडे मित्रपक्षांचे उमेदवार कमी निवडून कसे येतील याकडेही लक्ष देतात. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना संपविण्याचेच काम भाजपकडून केले जात असल्याची टीकाही पवार यांनी केली.
भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काही दिवसांपूर्वीच फक्त भाजपच देशात राहिल. प्रादेशिक पक्षांना भविष्यात अस्तित्व नसेल, असे वक्तव्य केले होते. तदनंतर नितीशकुमार यांनी टाकलेले पाऊल योग्यच आहे. भाजप त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना हळूहळू संपवतो, प्रकाशसिंग बादलांसारखे ज्येष्ठ नेते भाजपसोबत गेले आणि अकाली दल संपुष्टात आल्यात जमा आहे. राज्यातही शिवसेना भाजप अनेक वर्ष सोबत होते, आता भाजपने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरुन सेनेत फूट पाडली. हेच चित्र बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही दिसत होते.
नितीश कुमारांना बिहारमध्ये लोकमान्यता आहे, महाराष्ट्रातील चित्र बिहारमध्ये दिसेल असे वाटल्याने नितीशकुमार सावध झाले आणि ते भाजपपासून वेगळे झाले. भाजपने त्यांच्या या कृतीबद्दल कितीही टीकाटीपण्णी केली तरी त्यांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचेच होते व त्यांचा निर्णय योग्यच होता असे शरद पवार म्हणाले.