पीएफआय सदस्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानात, तपासात गंभीर गोष्टी उघड

पीएफआय सदस्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानात, तपासात गंभीर गोष्टी उघड
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (पीएफआय) या संघटनेच्या पाच संशयित सदस्यांचा व्हॉट्सअप ग्रुप असून, या ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानात असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

सोमवारी (दि.17) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचप्रमाणे संशयितांना राममंदिराच्या जागी बाबरी मशिद उभारण्याचा डाव होता, 2047 पर्यंत भारत मुस्लीम राष्ट्र बनवण्याचाही कट संशयितांनी आखल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे.

मालेगाव, पुणे, बीड, कोल्हापूर येथून पाच संशयितांना नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने 22 सप्टेंबरला अटक केली होती. त्यांना न्यायालयाने सुरुवातीस 12 दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा सोमवार (दि. 17)पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नेतृत्वाखाली राज्यात दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) नाशिक पथकाने 22 सप्टेंबर रोजी छापासत्र राबवून राज्यभरातून पाच संशयितांना अटक केली. या संघटनेच्या पदाधिकार्‍यांविरोधात देशभरात कारवाई केली जात असून, केंद्र सरकारने या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे या संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून देशविघातक कृत्य कोठे व कशी होणार होती, याचा तपास यंत्रणा करीत आहेत. संघटनेच्या 25 हून अधिक सदस्यांना राज्यभरातून पकडले आहे. दरम्यान, नाशिकच्या न्यायालयात हजर केलेल्या संशयितांकडून तपास यंत्रणांनी संगणक, मोबाइल, हार्डडिस्क, बँकेचे व्यवहार आदी तपासण्यात आले. त्यात संशयितांचा व्हॉट्सअप ग्रुप आढळून आला त्याचा अ‍ॅडमिन पाकिस्तानातील असल्याचे उघड झाले. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तानसह, यूएई, अफगाणिस्तान देशांमधील सदस्य सहभागी आहेत. दहशतवादविरोधी पथक या ग्रुपमधील संदेशांची चौकशी करत आहेत. त्याचप्रमाणे काही संशयित परदेशात जाऊन आले असून, त्यांच्या बँक खात्यातूनही मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले. या संशयितांची चार दिवसांची पोलिस कोठडी राखीव ठेवण्यात आली आहे. तपासात काही गोष्टी समोर आल्यानंतर या संशयितांची एकत्रित चौकशी करण्यासाठी भविष्यात चार दिवसांची पोलिस कोठडी घेण्यात येणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली.

तपासात या गंभीर गोष्टी उघड

येत्या 2047 पर्यंत भारत मुस्लीम राष्ट्र करणे
सिमी या दहशतवादी संघटनेच्या कामकाजानुसार पीएफआयच्या कामाची पद्धत होती
राममंदिर पाडून पुन्हा बाबरी मशीद उभारण्याचा होता कट
संशयितांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले असून, काहींनी परदेशातही वास्तव्य केल्याचे उघड
व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 175 ते 177 सदस्य

यांना सुनावली न्यायालयीन कोठडी

मौलाना सैफुर्रहमान सईद अहमद अन्सारी (26, मालेगाव), अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (48), रझी अहमद खान (31, दोघे रा. कोंढवा, पुणे), वसीम अझीम ऊर्फ मुन्ना शेख (29, रा. बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news