

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे 15 जून रोजी अयोध्येला जात असून, त्यांच्या या अयोध्या दौर्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या दौर्याची जबाबदारी नाशिकच्या सेना पदाधिकार्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याने आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा यशस्वी व्हावा नाशिकचे पदाधिकारी अयोध्येत तळ ठोकून आहेत. तसेच येत्या 13 जूनला नाशिकमधून तब्बल दीड हजार शिवसैनिक अयोध्येला जाणार असून, त्यासाठी विशेष अयोध्या ट्रेन बुक करण्यात आल्याची माहिती महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.
राज्यात शिवसेनेने भाजपशी युती तोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करीत राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून भाजपकडून सातत्याने शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यात मनसेनेही उडी घेतल्याने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. मनसेने आपला झेंडा भगवा केल्यानंतर राज ठाकरेंनी अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेण्याचे जाहीर केले होते. परंतु, या दौर्याला भाजपच्याच खासदाराने विरोध केल्यानंतर मनसेचा दौरा तूर्तास पुढे ढकलला गेला आहे.
भाजप आणि मनसेच्या हिंदुत्वाला उत्तर देण्यासह आता आदित्य ठाकरें 15 जून रोजी अयोध्या दौर्यावर जाणार आहेत. भाजप आणि मनसेला डिवचण्यासाठी शिवसेनेकडून हा मोठा इव्हेंट केला जाणार असून, या राजकीय दौर्याची जबाबदारी नाशिकच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्याकडे या अयोध्या दौर्याच्या नियोजनाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या शिष्टमंडळाने अयोध्या दौरा करून दौर्याचा आढावाही घेतला आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.
दौर्यात शक्तिप्रदर्शन
आदित्य ठाकरेंचा हा अयोध्या दौरा यशस्वी करण्यासह या दौर्यात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी नाशिकहून जवळपास दीड हजार शिवसैनिक अयोध्येला 13 जून रोजी जाणार आहे. त्यासाठी विशेष रेल्वे ट्रेन अयोध्येला जाणार आहे. येत्या सोमवारी ही विशेष ट्रेन नाशिकरोड येथून निघणार आहे. यासाठी शिवसैनिकांची जमवाजमव सुरू आहे. मनसेचा गड असलेल्या नाशिकमधूनच शिवसेनेचे पदाधिकारी अयोध्येला जाऊन हा दौरा यशस्वी करण्यासह मनसेला डिवचणार आहे.