

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा
बार्शी-कुर्डुवाडी बाह्यवळण रस्त्यावरील कुर्डुवाडी चौकामध्ये ट्रॅक्टर व खासगी आराम बसचा भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. तर 12 जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना आज ( दि. १२ ) पहाटे घडली. सिद्धार्थ अनिल शिंदे (वय 27 रा.वसवडी जि.लातूर) व मनोज शिवाजी विद्याधर (रा.बोधनगर ,लातूर) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, खासगी वाहतूक करणारी बस ( MH 24 AU 26 99 ) ही पुण्याहून बार्शीमार्गे लातूरकडे जात होती. ट्रॅक्टर क्रमांक ( MH 45 F 2989 ) हा नांदणी, ता.बार्शी येथून ऊस घेऊन विठ्ठल सहकारी कारखान्याकडे जात होता. या अपघातात खासगी बस व ट्रॅक्टर यांचा चक्काचूर झाला. यामध्ये ट्रॅक्टरचे सुमारे पाच लाखाचे तर बसचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या अपघातातून बचावलेले ट्रॅक्टर चालक औदुंबर कोंढारे (वय 24) यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघाताचे वृत्त समजताच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचा-यांनी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली.
रहमतअलि सादिकअली सय्यद (वय 29), वसंत तुकाराम पाडोळे (वय 65), विठ्ठल नामदेव पांचाळ (वय 91), नेहा विजय सावळे (वय 52), पार्वती बाबूराव बचुटे (वय 49), अश्विनी राहूल कदम (वय 26), मनिषा बाळासाहेब नलावडे (वय 27 ), पूजा ज्ञानेश्वर बारोले (वय 38), कालिदास निरु चव्हाण (वय 26 सर्व रा.लातूर) विजया किसन पांचाळ (वय 47 रा.पुणे), हेमचंद्र दौलत मोरे (वय 40 रा.बारामती), दत्ता रवन कांबळे (वय 28 रा. बाभळगांव ता. कळंब) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. सर्व जखमींना बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयासह खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. बार्शी तालुका पोलिस ठाण्यात याबाबत बस चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचले का?