ABG Shipyard ‍bank scam : घोटाळाप्रकरणी ईडीचे मुंबई, पुणे, सुरतमध्ये छापे

ABG Shipyard ‍bank scam : घोटाळाप्रकरणी ईडीचे मुंबई, पुणे, सुरतमध्ये छापे
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या एबीजी शिपयार्ड घोटाळ्याप्रकरणी (ABG Shipyard ‍bank scam) सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी (दि.२६) मुंबई, पुणे, सुरतमध्ये छापे टाकले. मुंबईत २४ ठिकाणी तर पुणे आणि सुरतमध्ये प्रत्येकी एका ठिकाणी हे छापे टाकण्यात आले असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. सुरतस्थित एबीजी शिपयार्ड कंपनी  (ABG Shipyard ‍bank scam) व तिच्या माजी प्रवर्तकांनी २८ बँकांची तब्बल २२ हजार ८४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

बनावट कंपन्या स्थापन करुन घोटाळ्याचा पैसा हवाला मार्गाने फिरविण्यात आला असल्याचा तपास संस्थांचा संशय आहे. यासंदर्भात एबीजीचे माजी अध्यक्ष रिशी अगरवाल यांची सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशी सुरु असल्याचेही समजते. कंपनीच्या तत्कालीन वरिष्ठ अधिकार्‍यांसह संबंधित लोकांचा घोटाळ्यातील सहभाग देखील तपासला जात आहे. एबीजी शिपयार्ड बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केलेला आहे. एबीजी शिपयार्डला सर्वाधिक कर्ज देणार्‍यांत आयसीआयसीआय बँक आघाडीवर आहे. या बँकेने कंपनीला ७ हजार ८९ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यापाठोपाठ आयडीबीआय बँकेने ३ हजार ६३९ कोटी रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाने २ हजार ९२५ कोटी रुपये, बँक ऑफ बडोदाने १ हजार ६१४ कोटी रुपये तर पंजाब नॅशनल बँकेने १ हजार २४४ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते.

२००५ ते २०१२ या कालावधीत एबीजी शिपयार्डने कर्ज उचलून तो विदेशातील कंपन्यांमध्ये फिरविला होता. नंतर या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. घोटाळ्यातील प्रमुख आरोपी रिशी अगरवाल याच्याविरोधात गेल्या फेब्रुवारी महिन्यात सीबीआयने लूकआऊट नोटिस जारी केली होती. एबीजी शिपयार्डचा बहुतांश घोटाळा तत्कालीन संपुआ सरकारच्या कार्यकाळात झाला होता, अशी माहिती त्यावेळी सीबीआयकडून देण्यात आली होती.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news