

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडोनेशियातील पूर्वी जावा प्रांतात एका फुटबॉल सामन्यात मोठा राडा झाला. पोलिसांच्या कारवाईनंतर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये १२७ लोकांचा मृत्यू झाला असून १८० लोक जखमी झाले आहेत. इंडोनेशियातील पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.
पूर्व जावाचे पोलिस प्रमुख निको अफिन्टा यांनी पत्रकारांना सांगितले की, अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यातील सामना संपल्यानंतर पराभूत संघाच्या समर्थकांनी मैदानावर हल्ला केला. दोन्ही क्लबचे समर्थक आपसात भिडले. यावर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यामध्ये १२७ जणांचा मृत्यू झाला असून १८० जण जखमी झाले आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.
इंडोनेशियन टॉप लीग बीआरआय लीग १ ने या सामन्यानंतर एका आठवड्यासाठी खेळांवर बंदी घातली आहे. या सामन्यात पर्सेबायाने ३-२ असा विजय मिळवला. फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडोनेशिया (PSSI) या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले. यापूर्वीही इंडोनेशियातील अनेक सामन्यांमध्ये वाद आणि मारामारीच्या घटना घडल्या आहेत.
हेही वाचा :