‘वोक कल्चर’, ‘कॅन्सल कल्चर’ म्हणजे काय?

‘वोक कल्चर’, ‘कॅन्सल कल्चर’ म्हणजे काय?
Published on
Updated on

सध्या जगभर 'वोक कल्चर' आणि 'कॅन्सल कल्चर' यावर चर्चा होतेय. अगदी हॅरी पॉटर लिहिणारी जे. के. रोलिंगपासून अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेकांनी याबद्दल आपली मत मांडली आहेत. हे नक्की काय आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. कारण गोष्ट जुनीच आहे, फक्त शब्दरचना बदललीय.

बाब्या आणि नार्‍यामध्ये थर्टी फर्स्टच्या पार्टीत जोरदार भांडण झालेलं. सकाळी दारातला पेपर उचलायला दार उघडलं तर राणे काकू लागलीच आत शिरल्या. पेपरमधल्या बातम्या वाचण्याआधीच नेने काकूंनी सोसायटीतलं बातमीपत्र ओकलं. बातमीचा मथळा काय तर पार्टीत, 'बेशरम रंग गाणं वाजवायचं नाही. कारण पठाण बॉयकॉट करायचाय'- बाब्या उर्फ बाबुराव गणपतराव आपटे.

सकाळचा चहा घ्यायला थेट आपट्यांच्याच घरी गेले. चहाचा पहिला घोट घेण्याआधी आपट्यांचे चिरंजीव डोळे चोळत बाहेर आले. मला पाहताच त्यांची गर्जना – मी नार्‍याला 'कॅन्सल' करणार सोसायटी ग्रुपमधून. मी म्हटलं, बाब्या, आज तीन जानेवारी 2023, अजून तुझी थर्टी फर्स्टची उतरली नाही की काय? तर तो म्हणतो कसा, मी थेज्ञश आहे. मी म्हटलं, अरे थेज्ञश नाही रुरज्ञश असतं ते. त्यामुळे ुेज्ञश नको होऊस. रुरज्ञश हो! यावर बाब्याचं उत्तर ऐकताच मी कपाळाला हात लावला!

काय होतं बाब्याचं उत्तर?

बाब्याचं उत्तर तुम्हाला मी सांगतेच; पण त्याआधी बाब्या आणि मी काय बोलत होतो ते समजून घ्या. बाब्या नार्‍याला कॅन्सल करणार म्हणजे काय तर बाब्या नार्‍याला बॉयकॉट करणार. अशाप्रकारे एखाद्याला, एखाद्या कलाकृतीला बॉयकॉट करणं म्हणजेच 'कॅन्सल कल्चर'चाच एक भाग. सध्या बॉयकॉट बॉलीवूड जबरदस्त ट्रेंडिगमध्ये आहे. आला सिनेमा की करा बॉयकॉट अशी प्रथा मागच्या वर्षात सुरू झालीच आहे. 'पठाण'च्या निमित्ताने या वर्षात ती सुरूच राहील.

कॅन्सल कल्चर किंवा कॉल-आऊट कल्चर 2010च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 2020 च्या सुरुवातीला सुरू झालं. त्यात एखाद्याला सामाजिक किंवा व्यावसायिक वर्तुळातून बाहेर काढलं जातं. मग ते ऑनलाईन असो, सोशल मीडियावर किंवा वैयक्तिकरीत्या. कॅन्सल कल्चर म्हणजे एखाद्याला त्याच्या किंवा तिच्या मतांसाठी, कृतींसाठी प्रतिबंधित करणं. बॉयकॉट बॉलीवूड हे भारतातल्या कॅन्सल कल्चरचाच एक भाग.

हॅरी पॉटरच्या जन्मदात्या जे. के. रोलिंग या कॅन्सल कल्चरच्या बळी ठरल्या. स्कॉटलंडमध्ये लिंग चाचणीबाबत नवीन कायदे करण्यात आले. स्कॉटलंड पोलिसांचं म्हणणं होतं की, बलात्कार किंवा कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात आरोपीने स्वत:ची ओळख एक महिला म्हणून दिली, तर पोलिस त्यांच्या रेकॉर्डमध्ये त्याची नोंद एक महिला म्हणून करतील. जरी आरोपीने कायदेशीररीत्या लिंग बदललं नाही तरीही.

काही स्त्रीवादी संघटनांनी या कायद्याला विरोध केला आहे. या कायद्यामुळे महिलांच्या आकडेवारीची अचूक नोंद होणार नाही आणि महिलांची वाईट प्रतिमा तयार होईल, असं स्त्रीवादी गटांचं म्हणणं आहे. हॅरी पॉटरच्या लेखिका जे.के. रोलिंग यांनी 'युद्ध म्हणजे शांतता. गुलामगिरी हे स्वातंत्र्य आहे. उपेक्षा हेच सामर्थ्य आहे. ज्याने तुमच्यावर बलात्कार केला ती एक स्त्री आहे', असं टि्वट केलं. ट्रान्सजेंडर समुदायाबाबतच्या या वादळी टि्वटनंतर जे. के. रोलिंग यांना अनेक नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागला. रोलिंग यांचं टि्वटर अकाऊंट हॅरी पॉटर फॅन्सकडूनच कॉल आऊट तसंच अनफॉलो करण्यात आलं.

कॅन्सल कल्चर हे वोक कल्चरला दिलेले उत्तर आहे. मी वोक आहे म्हणजे मी फक्त जागृत नाही तर माझ्या जाणिवा समृद्ध आहेत. मी माझी मतं फक्त समाजमाध्यमांवर पोस्ट करन थांबत नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यात तसा वागतो किंवा वागते. जर कोणी वोक नसेल तर त्याच्यासाठी, मी अमुक एका गोष्टीबाबत वोक आहे! तू नाहीयेस का? असा भेदभाव करत नाही.

माझं वोक असणं हे माझ्या आयुष्यभरासाठी नसून मला न पटणार्‍या विशिष्ट मुद्द्यांवर आहे. मी स्त्रीवादी महिला असून माझा टिकलीला विरोध आहे पण मला फॅशन म्हणून टिकली लावायला आवडते. याबद्दल कोणी जर त्याचे विचार मांडत नसेल, तर ती निद्रावस्थेत आहे म्हणजेच वोक नाही असं होतं का?

आता वोक असणं किंवा कॅन्सल करणं नवीनच आहे का? आणि फक्त युरोप किंवा भारतातच आहे का? आपण आपल्या साऊमायचा म्हणजेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा जागर करतोय. पण साऊंनाही स्त्री शिक्षणाचा वसा हाती घेतला म्हणून समाजाने कॅन्सल म्हणजेच बॉयकॉटच केलेलं की! त्यांच्यावर शेण फेकणारेही स्वत:ला वोक समजत असतील. पण खर्‍या वोक होत्या साऊ आणि जोतिबा.

हे दोघे फक्त वोक झाले नाही तर आपल्या जाणिवेनुसार समाज बदलायची कृती केली. ज्ञानोबांना सन्याशाची पोरं म्हणत वाळीत टाकणारे त्यांना कॅन्सलच करत होते. ही झाली इतिहासातली गोष्ट. अगदी आजही अनेक गावांत काही कुटुंबांना वाळीत टाकलं जातं. आमच्या एका मित्रानं एक गोष्ट सांगितली की, त्यांच्या नवबौद्ध कुटुंबाला वाडीतल्या आणि नवबौद्धांनीच वाळीत टाकलंय. कारण त्यांनी बौद्ध धर्माप्रमाणे आचरण केलं नाही म्हणून.

मुद्दा काय, तर अमेरिकन स्टाईलनं आज 'वोक कल्चर', 'कॅन्सल कल्चर' अशी नावं पडली असली, तरी विषय जुनाच आहे.
बराक ओबामा म्हणतात, फक्त वोक असून उपयोग नाही, मी त्या पुढे त्यासाठी काय करतो आहे याला महत्त्व आहे. मी वोक आहे, तू वोक आहेस का, असा प्रश्न मी समोरच्याला विचारत नाही; तर त्याची मतं काळजीपूर्वक समजून घेत मला पटत नसतील तर बदलण्याचा प्रयत्न करतो. हे खरं तर कॅन्सल करण्याऐवजी चांगलं आहे. सुधारण्याची संधी ही प्रत्येकाला मिळालीच पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीला बॉयकॉट करून त्याची त्या विषयावरची विचारप्रक्रियाच संपवणं हा गुन्हा ठरवला गेला पाहिजे. त्या व्यक्तीला सुधारण्याची पूर्ण संधी दिली गेली पाहिजे.

वोक हा 1930 पासून सुरू झालेला अफ्रो-अमेरिकन लोकांचा वंशवादाचा लढा आहे. हा वर्णवादाविरोधात उठवलेला आवाज आहे. पण हा फक्त रेसिझमपुरता मर्यादित नाही तर याचा आवाज 2010 पासून विस्तारला आहे. हा सेक्सिझमपासून भारतातल्या कास्टिझमपर्यंत येऊन पोचला आहे.

हिंदुत्ववादी संघटना हिंदूंवर होणार्‍या अन्यायाबाबत आवाज उठवणं, याला वोक म्हणत आहेत. पण खरंच वोक कशाला म्हणायचं हे समजण्याची गरज आहे. एखाद्याबाबत केला जाणारा न्याय हा दुसर्‍यावर अन्याय असू शकतो ही शक्यताच कोणी लक्षात घेत नाही. सोशल वर्क करणारी व्यक्ती समाजाच्या कल्याणासाठी जेव्हा तिच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करते, तेव्हा तो तिच्या मुलांवर अन्याय होत नाही का? त्यामुळेच आता अमेरिकेतल्या गौरवर्णीयांना कृष्णवर्णीयांचं उदात्तीकरण हा त्यांच्यावरचा अन्याय वाटत आहेत आणि याच कृष्णवर्णीयांना ते वोक पोलिस असं म्हणत आहेत. जसे आपल्याकडे मॉरल पोलिस तसे हे वोक पोलिस.

आता बाब्याचं उत्तर जाणून घेऊ. बाब्या असं म्हणतो, मी वोक नाही, अवेकच आहे. पण तुम्ही अवेक आहात का? मला या प्रश्नाचं उत्तर शोधायला ही वाचन, संशोधन आणि लेखनमीमांसा करावी लागली. त्यामुळे तरुणांनो, सोशल मीडियावर लांबच्या लांब पोस्टी टाकण्यापेक्षा तुम्ही तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात वोक आहात का, हा प्रश्न स्वत:ला विचारा अन् मग स्वत:पासून त्याची सुरुवात करा.

अश्विनी पारकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news