चांगली बातमी ! ‘कोड ब्लू’कडून 494 जणांना जीवदान

चांगली बातमी ! ‘कोड ब्लू’कडून 494 जणांना जीवदान
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ससून रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्णांना अतितातडीचे उपचार देण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या 'कोड ब्लू टीम'ने गेल्या पाच महिन्यांमध्ये 788 रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यापैकी 494 रुग्णांचे प्राण वाचवण्यात 'कोड ब्लू' टीमला यश आले आहे. स्वतंत्र पथक नियुक्त करणारे बी. जे. मेडिकल कॉलेज राज्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे.अत्यवस्थ रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांना सीपीआर देण्यासाठी आणि अतितातडीचे उपचार देण्यासाठी ससून रुग्णालयात जुलै महिन्यात 'कोड ब्लू' टीम कार्यान्वित करण्यात आली. यामध्ये सुमारे 70 जणांचे पथक अत्यावश्यक साधनसामग्रीसह सज्ज ठेवण्यात आले आहे. मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 'कोड ब्लू'चे ऑफिस उभारण्यात आले आहे. तेथून अत्यवस्थ रुग्णांवर 3 ते 5 मिनिटांत तातडीचे उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

ससूनमध्ये बरेचदा अत्यवस्थ रुग्ण दाखल होतात किंवा वॉर्डातील गंभीर रुग्णांची परिस्थिती अतिगंभीर होते. अशावेळी स्ट्रेचरवर घेऊन आयसीयू बेड उपलब्ध आहे की नाही, हे पडताळून तिथवर घेऊन जाईपर्यंत रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. गंभीर परिस्थिती टाळण्यासाठी रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत, यासाठी कोड ब्लू टीम अत्यावश्यक उपकरणांसह तैनात ठेवली आहे. शल्यचिकित्सक शास्त्र विभागप्रमुख डॉ. रोहिदास बोरसे, शल्यचिकित्सक शास्त्र प्राध्यापक डॉ. एच. बी. प्रसाद, भूलतज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ. संयोगिता नाईक, भूलतज्ज्ञ प्राध्यापक डॉ. सुरेखा शिंदे, इमर्जन्सी मेडीसिन विभागप्रमुख डॉ. राजेश्वरी वोहरा, डॉ. सुजित क्षीरसागर, अधिसेविका विमल केदार, नर्सिंग इन्चार्ज शीला चव्हाण, कोड ब्ल्यू समन्वयक गौरव महापुरे यांचा 'कोड ब्ल्यू' टीममध्ये समावेश आहे. शल्यचिकित्सक शास्त्र, भूलतज्ज्ञ, इमर्जन्सी मेडीसिन विभागांतील सर्व निवासी डॉक्टर आणि नर्स रुग्णांचा जीव वाचवण्याचे काम करत आहेत.

अतिगंभीर रुग्णांना ससूनमध्ये दाखल झाल्यापासून पाच मिनिटांत वैद्यकीय मदत देण्यासाठी 'कोड ब्लू' टीम सज्ज आहे. यामध्ये इंटेन्सिव्हिस्ट (अतिदक्षता विभागतज्ज्ञ), डॉक्टर आणि परिचारिका यांचा समावेश आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये या टीममुळे 494 जणांचे प्राण वाचले आहेत.
                                           – डॉ. श्रीनिवास शिंत्रे, प्रभारी अधिष्ठाता.

रुग्णाचे हृदय अचानक बंद पडणे, श्वासोच्छवास थांबणे किंवा शुध्द हरपणे अशी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचे प्राण वाचवण्यासाठी पाच मिनिटांमध्ये 'कोड ब्लू' टीम अतितत्पर उपचार पुरवत आहे. कोड ब्लू टीम कार्यान्वित केल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये कमी मनुष्यबळात उच्च दर्जाची रुग्णसेवा देणे शक्य होत आहे. अत्यवस्थ रुग्ण दाखल झाल्यास त्याची माहिती टीमच्या सदस्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी रुग्णालय आणि महाविद्यालय परिसरात 46 स्पीकर बसवण्यात आले आहेत.
                            – डॉ. किरणकुमार जाधव, वैद्यकीय अधीक्षक, ससून रुग्णालय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news