

मुंबई; पुढारी ऑनलाईन
राज्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांची 'सोशल मीडिया लॅब' सक्रिय झाली आहे. जातीय तेढ निर्माण करु शकणाऱ्या आत्तापर्यंत ३ हजार पोस्ट मुंबई पोलिसांनी डिलीट केल्या आहेत. रामनवमी नंतर राज्यातील काही भागात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवले जात आहे.
मानखुर्दच्या म्हाडा वसाहतीमधील कोयना सोसायटीजवळ ४० ते ४५ अनोळखी तरुणांच्या जमावाने वाहनांची तोडफोड केली होती. ही घटना रविवारी (दि.११) रात्री घडली होती. तरूणांच्या हातातील तलवार, लाकडी बांबू व ॲल्युमिनियम पाईपमुळे या भागात काही काळ दहशत पसरली होती. मानखुर्द प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३० जणांना अटक केली आहे.
दरम्यान, राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरुन राजकारण तापलेले असताना नाशिक पोलीस आयुक्तांनी महत्वाचे आदेश जारी केले आहेत. नाशिक शहरातील सर्व प्रकारचे भोंगे आणि ध्वनिक्षेपके उतरविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. नाशिकमधील सर्व धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी लागणार असून विनापरवानगी कोणत्याही धार्मिक अथवा अन्य ठिकाणी लाऊड स्पीकर लावता येणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.