

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जिल्हा राखीव रक्षक दलाचे (डीआरजी) ३ जवान शहीद झाले. तर २ जखमी झाले आहेत. आज (दि.२५) सकाळी ८.३० च्या सुमारास ही चकमक सुरू झाली होती. एएसआय रामुराम नाग, सहाय्यक हवालदार कुंजम जोगा आणि वंजाम भीमा अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.
नक्षलवाद्यांशी झालेल्या या चकमकीत एक सहाय्यक उपनिरीक्षकासह, जिल्हा राखीव रक्षक दलाचे ३ जवान शहीद झाले आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.
पोलीस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी यांनी सांगितले की, डीआरजी टीम शोध मोहिमेवर असताना जागरगुंडा आणि कुंदेड गावांदरम्यान ही चकमक झाली. राजधानी रायपूरपासून 400 किमी अंतरावर असलेल्या जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून या पथकाने ही कारवाई सुरू केली होती.
दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झाल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध करत मुख्यमंत्री म्हणाले की, जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.
हेही वाचा