2022 Gujarat Election : गुजरातेत मोदींची सुनामी! १५६ जागांवर ऐतिहासिक विजय; भाजपने गमावलेले हिमाचल काँग्रेसने कमावले!

2022 Gujarat Election
2022 Gujarat Election
Published on
Updated on

गांधीनगर : वृत्तसंस्था;  बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आतापर्यंतचे सारे विक्रम मोडीत काढत विजयाची सप्तपदी पूर्ण केली. १८२ जागांपैकी १५६ जागा जिंकत भाजपने (2022 Gujarat Election) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याची जणू सुनामी अनुभवली. मागील वेळी ७८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी मात्र दारुण पराभव पत्करावा लागला. त्यांना अवघ्या १७ जागाच मिळविता आल्या; तर आम आदमी पार्टीला केवळ ५ जागा मिळविता आल्याने त्यांचा दिल्ली पॅटर्न निष्प्रभ ठरला आहे.दुसरीकडे, हिमाचल प्रदेशात मात्र ६८ पैकी ४० जागा जिंकल्याने काँग्रेसच्या जखमेवर फुंकर बसली. भाजपला हिमाचलात मोठा पराभव पाहावा लागला. भाजपला अवघ्या २५ जागा मिळाल्याने गमावलेले हिमाचल कमावल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या या निवडणुकांच्या निकालांमुळे भाजपचा उत्साह दुणावला आहे. भाजपच्या गुजरात विजयाचा देशभर जल्लोष साजरा करण्यात आला.दुसरीकडे, पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या मतदारांचे आभार मानले आहेत.

गुजरातेत मोदींची सुनामी!

१ आणि ५ डिसेंबर रोजी गुजरातमध्ये मतदान झाले होते. गुरुवारी सकाळी राज्यांत मतमोजणीला प्रारंभ झाला. मतदानोत्तर चाचण्यांनी दिलेल्या अंदाजांसारखीच भाजपची घोडदौड सुरू झाली आणि ती शेवटी १५६ जागा घेऊनच थांबली. सलग २७ वर्षे सत्तेत असणाऱ्या भाजपच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर दिसलाच नाही. भाजपच्या विजयाचा अश्वमेध चौखूर धावत असताना काँग्रेसने आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी नोंदवली. गेल्या निवडणुकीत ७८ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी कशाबशा १७ जागा जिंकता आल्या. दुसरीकडे, विजयाची हवा करणाच्या आम आदमी पक्षालाही गुजरातच्या मतदारांनी नाकारल्याचे निकालावरून दिसते. 'आप'ला अवघ्या पाच जागा जिंकता आल्या. अपक्ष व इतरांनी चार जागा जिंकल्या. 'आप'ने शहरी भागांत काँग्रेसच्या मतांना सुरुंग लावल्याचे दिसते. भाजपला ५४ टक्के मते मिळाली; तर 'आप'ला १३ टक्के आणि काँग्रेसला २७ टक्के मते मिळाली.

2022 Gujarat Election : २०२४ मध्ये पुन्हा भाजप

गुजरातमध्ये भाजपला विक्रमी, उच्चांकी यश मिळाले. हिमाचल प्रदेशमध्येही भाजप केवळ एक टक्क्याने विजयापासून दूर राहिला. हे अंतर तसे फार नाहीच. गुजरात, हिमाचलसह या साऱ्याच निवडणुका मध्य प्रदेशसह येऊ घातलेल्या अन्य राज्यांच्या निवडणुकांत आणि लोकसभेच्या २०२४ मधील निवडणुकांत काय घडणार आहे, त्याचे स्पष्ट
भवितव्य वर्तविणाऱ्या आहेत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केला.

दोन राज्ये, तीन निकाल

• गुजरातमधील ऐतिहासिक विजयाने मोदी करिष्मा कायम असल्याचे सिद्ध केले.
• हिमाचलने सत्ताबदलाची परंपरा जपत काँग्रेसला संजीवनी दिली.
• दोन्ही राज्यांत पराभूत आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली.

विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद : पंतप्रधान

गुजरातच्या अभूतपूर्व विजयाने मी भारावलो आहे. जनादेशाच्या माध्यमातून जनतेने विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दिले असेच मी समजतो. त्याच वेळी विकासाची गती कायम राखण्यास हा जनादेश सहाय्यभूत ठरेल. या विजयाचे खरे शिल्पकार घाम गाळणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हते. गुजरातच्या जनशक्तीसमोर झुकून मी अभिवादन करतो, असे भावपूर्ण उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

2022 Gujarat Election :गुजरात भाजपचा बालेकिल्ला!

  • गुजरातेत १७ महिन्यांचा अपवाद सोडला तर गेल्या २७ वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. पुढे आणखी ५ वर्षे ते असेलच असेल.
    १९९५ मध्ये पहिल्यांदा केशूभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरातेत भाजपचे सरकार स्थापन झाले.
  • ऑक्टोबर १९९६ मध्ये भाजपचे नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्षाविरुद्ध बंड करून काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले… वाघेला यांनी बंडानंतर राष्ट्रीय जनता पार्टी नावाने नवा पक्ष स्थापन केला होता.
  • ऑक्टोबर १९९७ मध्ये वाघेला यांनी राजीनामा दिला. 'राजप'- चेच दिलीप पारिख मुख्यमंत्री बनले. मार्च १९९८ पर्यंत ते या पदावर होते. १९९५ नंतरचे हेच १७ महिने भाजपचे सरकार राज्यात नव्हते.
  • गत निवडणुकीत भाजपला ९९, तर काँग्रेसला ७८ जागा मिळाल्या होत्या.
  • २०१२ च्या निवडणुकीत भाजपला ११५, तर काँग्रेसला ६१ जागांवर विजय मिळाला होता.
  • २००७ मध्ये भाजपला ११७ व काँग्रेसला ५९, २००२ मध्ये भाजपला १२७ व काँग्रेसला ५१, १९९८ मध्ये भाजपला ११७ व काँग्रेसला ५३ जागा, १९९५ मध्ये भाजपला १२१ व काँग्रेसला ४५ जागा मिळाल्या होत्या.

मोदी करिष्मा कायम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा कायम असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले. तब्बल ३१ जाहीर सभा घेत मोदी यांनी आपले गृहराज्य खऱ्या अर्थाने पिंजून काढले. गुजराती अस्मितेच्या मुद्दयावर त्यांनी घातलेली साद मतदारांना भावली. त्यांनी भाजपला भरभरून जागा दिल्या. गेल्या वेळी सौराष्ट्राने भाजपला साथ दिली नव्हती. यंदा त्यांनी तिथे विशेष लक्ष घालत गड ताब्यात आणला.

2022 Gujarat Election :१२ डिसेंबरला शपथविधी !

भाजपने मुख्यमंत्री म्हणून विद्यमान मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांचेच नाव जाहीर केले आहे. ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून १२ तारखेला शपथ घेणार आहेत. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहाणार आहेत.

काँग्रेसला हिमाचलची संजीवनी

हिमाचल प्रदेशने मात्र काँग्रेसला संजीवनी दिली. तेथे ६८ पैकी ४० जागा जिंकत काँग्रेसने सत्तेचे दार उघडले. हिमाचलात भाजपला अवघ्या २५ जागा मिळाल्याने सत्ता गमवावी लागली. हा मुख्यमंत्री जयराम ठाकूर, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना मोठा धक्का आहे. काँग्रेस आपल्या आमदारांना सुरक्षितस्थळी हलवणार असून लवकरच मुख्यमंत्री कोण हे ठरवले जाणार आहे. हिमाचलमध्ये प्रत्येक निवडणुकीत ४५ ते ७५ टक्के मंत्री पराभूत होतात, असा आजवरचा अनुभव आहे. यावेळीही तसेच झाले. दहापैकी ८ विद्यमान मंत्री यावेळी पराभूत झाले. सुरेश भारद्वाज, रामलाल मारकंडा, वीरेंद्र कंवर, गोविंद सिंह ठाकूर, राकेश पठाणिया, डॉ. राजीव सैजल, सरवीण चौधरी, राजेंद्र गर्ग यांचा त्यात समावेश आहे. जयराम ठाकूर यांच्यासह बिक्रम ठाकूर आणि सुखराम चौधरी यांनी निवडणूक जिंकली आहे.

नवा मुख्यमंत्री कोण? प्रतिभा सिंह, की सुक्खू ?

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष प्रतिभा सिंह तसेच माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंह सुक्खू यांची नावे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. प्रतिभा सिंह या माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी असून, मंडीच्या खासदारही आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news