Gujarat Elections result : काँग्रेस नेतृत्वाच्या उदासीनतेमुळे भाजपचा गुजरातमध्ये अभूतपूर्व विजय | पुढारी

Gujarat Elections result : काँग्रेस नेतृत्वाच्या उदासीनतेमुळे भाजपचा गुजरातमध्ये अभूतपूर्व विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात विधानसभा निवडणुकीत  (Gujarat Elections result) भाजपने सातव्यांदा बहुमत सिद्ध करत सत्ता कायम ठेवली आहे. तर काँग्रेस आणि आपला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपने १५७ जागांवर आघाडी घेत विक्रमी बहुमत प्राप्त केले. तर काँग्रेस केवळ १६ जागांवर तर आप ५ जागांवर आघाडीवर आहे. गुजरातमधील भाजपच्या अभूतपूर्व विजयासाठी कारणीभूत ठरलेल्या मुद्द्यांचा परमार्श ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. प्रकाश पवार यांनी घेतला आहे. तो जाणून घेऊया.

(Gujarat Elections result) गुजरातमध्ये १३ टक्के मतदान आपने घेतले आहे. तर २७ टक्के मतदान काँग्रेसने घेतले आहे. सर्वाधिक मते भाजपने ५२ टक्क्यांच्या आसपास घेतली आहेत. गुजरातमध्ये अन्टी इन्कम्बंसी होती. परंतु ही सत्ताविरोधी लाट काँग्रेस आणि आप या दोन पक्षांत विभागली आहे. याचा फायदा भाजपला झाला.

गुजरातमध्ये आर्थिक पातळीवरील नेतृत्व अंबानी आणि अदानी यांच्या रूपाने भाजपला मिळाले, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पाठबळ होते. संघटनात्मक पातळीवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद भाजप उमेदवारांच्या पाठिशी होती. त्याचबरोबर बूथ कमिटीपर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी केलेले काम भाजपला बहुमताकडे नेऊ शकले. निवडणुकीत आपणच जिंकू शकतो, दुसरा पक्ष आपल्या समोर टिकू शकणार नाही, ही मानसिकता भाजपने बिंबवली.

ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न निकालात काढल्याने गुजरातच्या शहरी भागासह ग्रामीण भागात डेअरी आणि सहकार क्षेत्रातून नवश्रीमंत वर्ग वाढला आहे. याचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला. त्याचबरोबर जातीच्या आधारावर संघटन करण्याची पध्दत भाजपने संपुष्टात आणून भाजप, हिंदुत्व आणि विकासाकडे वळवली. भाजपची संघटनात्मक बांधणी तळागाळापर्यंत पोहोचली आहे. बुथवरच मतदारांना माहिती देण्याची व्यवस्था भाजपकडे आहे. कोणता गट, पक्ष, उमेदवार यांची माहिती नसणाऱ्या मतदाराला भाजपकडे आकर्षित करण्यास भाजप यशस्वी ठरला.

तर दुसरीकडे भाजपच्या बलस्थानांना आव्हान देण्याची ताकद काँग्रेसमध्ये राहिली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी गुजरातमध्ये प्रचारासाठी कमी वेळ दिला. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे अखेरच्या टप्प्यात प्रचारासाठी उतरले. राजकीय नेतृत्वामध्ये महत्त्वाकांक्षेचा अभाव दिसून आला. परिणामी काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसचे अपयश नेतृत्वाच्या पातळीवर दिसून येत आहे. तर प्रस्थापितांच्या विरोधातील मतदारांच्या मतांचा फायदा आपपेक्षा भाजपला झाला. हिमाचल प्रदेशात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी सातत्याने संघटनेच्या संपर्कात होत्या. तेथे संघटन मजबूत केले. राजकीय नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा अधोरेखित केली. त्यामुळे तेथे पक्षाला विजयापर्यंत पोहचता आले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button