Violence rocks Ranchi : रांचीमध्‍ये हिंसाचाराचा आगडोंब, दोन ठार; पोलिस अधीक्षकांसह १३ गंभीर जखमी

Violence rocks Ranchi : रांचीमध्‍ये हिंसाचाराचा आगडोंब, दोन ठार; पोलिस अधीक्षकांसह १३ गंभीर जखमी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :  भाजपच्‍या निलंबित नेत्‍या नुपूर शर्मा यांच्‍या वादग्रस्‍त विधानावर झारखंडमधील रांची येथे शुक्रवारी हिंसाचाराचा आगडोंब उसळला. ( Violence rocks Ranchi ) हिंसाचारात दोन जण ठार झाले असून, १० पोलिस ठाण्‍याच्‍या हद्‍दीत जमावबंदीचा आदेश देण्‍यात आला आहे. या परिसरातील इंटरनेटसेवा बंद करण्‍यात आली आहे, अशी माहिती आज ( दि. ११ )पोलिस सूत्रांनी दिली. दरम्‍यान, या हिंसाचाराच्‍या निषेधार्थ हिंदुत्त्‍ववादी संघटनांनी रांची बंदचे आवाहन केले आहे.

Violence rocks Ranchi : हिंसाचारात १३ जण गंभीर जखमी

रांचीमधील सुखदेव नगर, लोअर बाजार, डेली मार्केट आणि हिंदपिडी परिसरात हिंसक जमाव शुक्रवारी रस्‍त्‍यावर उतरला. यावेळी झालेल्‍या हिंसाचारात १३ जण गंभीर जखमी झाले होते. त्‍यांना रांची येथील आरआयएमएस हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले. यातील दोघांचा आज पहाटे उपचार सुरु असताना मृत्‍यू झाला.

जमावाने केलेल्‍या हल्‍ल्‍यात रांचीचे वरिष्‍ठ पोलीस अधीक्षक ( एसएसपी) सुरेंद्र कुमार झा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्‍यांच्‍या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली असून, त्‍यांच्‍यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्‍याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. राज्‍यपाल रमेश बैस यांनी या हिंसाचाराचा तीव्र शब्‍दात निषेध केला आहे. हिंसाचार घडविणार्‍यांवर कडक कारवाई करण्‍यात यावी, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

पश्‍चिम बंगालमध्‍ये हिंसाचाराचे सत्र सुरुच, जमावाची पोलिसांवर दगडफेक

नुपूर शर्मा यांच्‍या वादग्रस्‍त विधानावर पश्‍चिम बंगाल राज्‍यात सलग दुसर्‍या दिवशीही तीव्र पडसाद उमटले. हावडा येथील पंचला बाजार येथे जमावाने निदर्शने केली. यावेळी जमावाला पांगविण्‍यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्‍या कांड्या फोडल्‍या. जमावाने पोलिसांवर हल्‍ला केला. हावडामधील राष्‍ट्रीय महामार्ग परिसरात आणि रेल्‍वे स्‍टेशन परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

पश्‍चिम बंगालची राजधानी कोलकातामध्‍ये शुक्रवारी जमाव रस्‍त्‍यावर उतरला. त्‍यांनी नुपूर शर्मा यांच्‍या अटकेची मागणी केली. जमावाने हावडा राष्‍ट्रीय महामार्गावर रास्‍ता रोको केला. यामुळे हावडा परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

उत्तर प्रदेशमध्‍ये ५ हजारांहून अधिक जणांवर गुन्‍हे

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज, सहारनपूर, मुरारबाद, हाथरस आणि फिरोजाबाद शहरांमध्‍येही मागील दोन दिवस समाजकंटकांनी हिंसाचार घडवून आणला. मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. हिंसाचार घडवून आणणार्‍यांवर कडक कारवाई करण्‍याचे आदेश त्‍यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. हिंसाचारप्रकरणी उत्तर प्रदेशमध्‍ये विविध जिल्‍ह्यांत ३०० जणांना अटक करण्‍यात आली आहे. तर पाच हजारांहून अधिक जणांवर गुन्‍हे दाखल केले आहेत. प्रयागराज येथील हिंसाचाराचा मास्‍टरमांईड मुहंम्‍मद जावेद याला अटक करण्‍यात आली आहे, अशी माहिती स्‍थानिक पोलिसांनी दिली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news