कर्नाटकात भाजपला ३, काॅंग्रेसला १ जागा, निर्मला सीतारामन विजयी; चिदम्बरम, सिब्बल बिनविरोध | पुढारी

कर्नाटकात भाजपला ३, काॅंग्रेसला १ जागा, निर्मला सीतारामन विजयी; चिदम्बरम, सिब्बल बिनविरोध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था; राज्यसभेच्या चार राज्यांतील 16 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. लगेचच मतमोजणीस सुरुवात झाली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राजस्थानात काँग्रेसने तीन जागांवर विजय मिळविला आहे. भाजपला एक जागा मिळाली आहे. राज्यसभेच्या 57 पैकी 41 जागा बिनविरोध झाल्या. अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांचा पराभव झाला. कर्नाटकमध्ये भाजपच्या निर्मला सीतारामन आणि काँग्रेसचे जयराम रमेश विजयी झाले. काँग्रेसला नुकतीच सोडचिठ्ठी देऊन समाजवादी पार्टीत गेलेले उमेदवार कपिल सिब्बल तसेच माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम आणि राजीव शुक्ला बिनविरोध निवडून आले.

कर्नाटकमध्ये भाजपला तीन जागांवर, तर काँग्रेसला एका जागेवर विजय मिळाला. भाजपकडून निर्मला सीतारामन यांच्यासह दाक्षिणात्य अभिनेते जग्गेश तसेच लहर सिंह विजयी झाले आहेत. काँंग्रेसचे उमेदवार तसेच माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश 46 मते मिळवून विजयी झाले. मन्सूर अली खान (काँग्रेस) यांना 25, कुपेंद्र रेड्डी (जेडीएस) यांना 30 मते मिळाली. राजस्थानात काँग्रेसचे तिघे उमेदवार मुकुल वासनिक, रणदीपसिंह सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी विजयी झाले आहेत. सुरजेवाला यांना 43, वासनिक यांना 42, तर तिवारी यांना 41 मते मिळाली. भाजपचे घनश्याम तिवारी यांना 43, तर अपक्ष सुभाष चंद्रा यांना 30 मते मिळाली. शिवाय हरियाणात 2, महाराष्ट्रात 6 जागांसाठी मतदान झाले आहे.

तत्पूर्वी काही काळ निवडणूक आयोगाने तूर्त सर्वच राज्यांतील मतमोजणी थांबविली होती. भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणूक रद्द करण्याची मागणी केली. निवडणुकीदरम्यान गोपनीयतेच्या नियमाचे पालन झाले नाही, अशी तक्रार या शिष्टमंडळाने केली. दुसरीकडे काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही निवडणूक आयोगाला भेट दिली. काँग्रेसच्या शिष्टमंडळात माजी मंत्री पवन बन्सल, रणजित राजन, विवेक तनखा सहभागी होते. तनखा म्हणाले, आमच्या पक्षाने गोपनीयतेचा भंग केलेला नाही. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया पार पाडायला हवी.

तत्पूर्वी राजस्थानातील 4, हरियाणातील 2, महाराष्ट्रातील 6 आणि कर्नाटकातील 4 जागांसाठी मतदान झालेले आहे. चारही राज्यांत मतदानावरून वाद उद्भवले. राजस्थानात भाजपच्या शोभारानी यांनी काँग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी यांना मत दिले आहे. तिकडे कर्नाटकमध्येही के. श्रीनिवास गौडा यांनी खुलेआम सांगितले, मी काँग्रेसला मत दिले आहे. हा पक्ष मला आवडतो. हरियाणात गोपनीयतेच्या भंगावरून काँग्रेसची दोन मते रद्दबातल ठरविण्यात आली आहेत. किरण चौधरी आणि बत्रा यांनी एजंटऐवजी अन्य एका व्यक्तीलाही दिलेले मत दाखविले होते. राज्यसभेच्या 57 जागांसाठी ही निवडणूक होती, पण 41 जागांवर बिनविरोध निवड झाली.

सुप्रीम कोर्टात याचिका

आमदारांच्या घोडबाजाराच्या शक्यतेनंतर प्रशासनाने आमेर भागात इंटरनेट सेवा 12 तासांसाठी बंद केली होती. बसपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या 6 आमदारांच्या मतदानाच्या वैधतेचाही मुद्दा होता. त्यावरून राजस्थानचा निर्णय रोखण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.

Back to top button