तहसीलदार दीपक आकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात | पुढारी

तहसीलदार दीपक आकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

कल्याण; पुढारी वृत्तसेवा : कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या वरप गावठाण हद्दीतील जमिनीबाबतच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्याकरिता 1 लाख 20 हजारांची मागणी करणारे कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे (45) आणि त्यांचा शिपाई बाबू हरड (42) या दोघांना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

महात्मा फुले पोलीस ठाण्यात या दोन्ही लाचखोरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करताच महसूल खात्यात खळबळ उडाली.

यातील तक्रारदाराचा बांधकाम व्यवसाय आहे. त्यांच्या कल्याण तालुक्यातल्या वरप गावातील एका जमिनीबाबत तहसीलदार दीपक आकडे यांच्यासमोर सुनावणी सुरू होती.

तहसीलदार आकडे यांनी 26 ऑगस्ट रोजी शिपाई मनोहर उर्फ बाबू याच्यामार्फत 1 लाख रुपये स्वतःसाठी व कार्यालयीन कामकाज करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी 20 हजार अशी एकूण 1 लाख 20 हजार रुपयांची मागणी त्यांच्याकडे केवळ निकालपत्र देण्यासाठी केली होती.

सुनावणीचा निकाल स्वयंस्पष्ट असतानाही त्यांनी पैशांसाठी तगादा लावला. परिणामी, बांधकाम व्यावसायिक तक्रारदाराने ठाण्याच्या लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

कार्यालयातच रंगेहाथ पकडले

सोमवारी दुपारच्या सुमारास तक्रादार हे लाचखोरांना 1 लाख 20 हजार रुपयांची लाच देण्यासाठी गेले असता तहसीलदार दीपक आकडे आणि त्यांचा साथीदार शिपाई बाबू हरड या दोघांना सापळा रचून ठाणे लाचलुचपत पथकाने तहसील कार्यालयातच रंगेहाथ पकडले.

Back to top button