Raigad : समुद्राच्या भरतीमुळे शहापूर, धेरंड उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर | पुढारी

Raigad : समुद्राच्या भरतीमुळे शहापूर, धेरंड उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा;  रविवार १९ फेब्रुवारी रोजीच्याअमावास्येपासून समुद्राच्या सुरू झालेल्या मोठ्या सागरी उधाणांच्या भरतीचे खारे पाणी अलिबाग तालुक्यांतील शहापूर व धेरंड या गावांमध्ये पुन्हा घुसले असून, महसूल विभागाने बुधवारी केलेल्या नुकसानी पंचनाम्यांनुसार आतापर्यंत गावांतील ८०० एकर भातशेती आणि २०० मत्स्य तलावांतील जिताड व अन्य मासे पूणर्पणे वाहून गेले आहेत. (Raigad )

गावांच्या पूर्वेच्या ३६ घरांभोवती समुद्र उधाण भरतीच्या या खाऱ्या पाण्याचा वेढा पडला आहे. परिणामी, ही गावे पूणर्पणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती या गावांतील शेतकऱ्यांची संघटना श्रमिक मुक्ती दल या संघटनेचे जिल्हा संघटक राजन भगत आणि या सातत्याने येणाऱ्या आपत्तीचे अभ्यासक स्थानिक शेतकरी प्रा. सुनील नाईक यांनी दिली आहे. दरम्यान, याच फुटलेल्या बंधाऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी बैठक बोलावली असून, त्याच हा विषय तापणार असे चित्र आहे.

Raigad : २०० मत्स्य तलावांतील मासे वाहून गेले

उधाणाच्या भरतीचे खारेपाणी ग्रामस्थांच्या घरात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या पायरीपर्यंत खारेपाणी अद्याप साचून राहिलेले आहे. जिताडा माशांच्या उत्पादनासाठी राज्यात सुप्रसिद्ध असणाऱ्या या गावांमध्ये सुमारे ६०० मत्स्य तलाव आहेत. त्यापैकी गावांच्या पूर्वेकडील भागातील २०० मत्स्य तलावांमध्ये सागरी उधाणाचे खारेपाणी घुसल्याने त्यातील तयार आणि विक्रीयोग्य झालेले जिताडा मासे पूर्णपणे वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले असल्याची माहिती प्रभाकर म्हात्रे यांनी दिली आहे.

  • धेरंड पूर्ण गावातील, मोठे शहापूर गावांतील आणि धाकडापाडा जिताडा व्हिलेजमधील एकूण ८०० एकर शेतजमीन खाऱ्या पाण्याखाली आहे
  • शेतीत खारेपाणी घुसल्याने आगामी तीन वर्षे भातशेती जमीन नापिकी व ओसाड राहणार
  •  ३६ घरांना खाऱ्या पाण्याचा वेढा, पाया खचण्याची शक्यता
  •  २०० मत्स्य तलावांतील मासे वाहून गेले,
  • प्रतितलाव सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान

संरक्षक बंधारा एमआयडीच्या जागेत असल्याने त्याच्या दुरुस्ती देखभालीची जबाबदारी एमआयडीसीची आहे. त्याकरिता कार्यकारी अभियंता एमआयडीसी यांनी १२ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला असून त्याचे काम होईल. दरम्यान, शहापूर धेरंड गावांत घुसलेल्या पाण्यामुळे झालेल्या
नुकसानीचा अहवाल मागवण्यात आला आहे…
-डॉ. पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रमुख आपत्ती निवारण प्राधिकरण, रायगड.

हेही वाचा

Back to top button