Heatwave alert : महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीला उष्णतेच्या लाटेचा इशारा | पुढारी

Heatwave alert : महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीला उष्णतेच्या लाटेचा इशारा

पुढारी ऑनलाईन : येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी आणि कच्छला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात यलो अलर्ट देण्यात आला असून, तापमान ३९ अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. पुढचे ४८ तास या भागाला उन्हाच्या झळा जाणवणार आहेत, असे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, सकाळी ११  ते दुपारी २ या वेळेत बाहेर जाणे टाळावे, तसेच प्रवास करताना पाण्याची बाटली जवळ आवश्यक ठेवावी आणि काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हवामान विभाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या दोन दिवसात तापमान वाढून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान 37-39°C च्या रेंजमध्ये राहणार आहे. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत प्रचंड उन्हाचा कडाका जाणवणार असून, दरम्यानच्या काळात या भागातील लोकांनी काळजी घेण्याचे आव्हान हवामान विभागाने केले आहे.

राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवसा कडक तडाका, रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका असे विचित्र वातावरण आहे. राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वातावरणात चढ-उतार दिसून येत आहे. हिमालयीन भागासह उत्तर भारतात सातत्याने हवामानात बदल होत असल्यामुळे राज्यात देखील बदल होत असल्याचे दिसून येत असल्याचे हवामान विभागाने महटले आहे.

उत्तरेकडून महाराष्ट्राच्या काही भागात कोरडे आणि उष्ण वारे वाहणार असल्याने कोकण किनारपट्टीवरील तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात तसेच गोव्याच्या बहुतांश भागात पुढील तीन दिवस कमाल तापमान चढेच राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Back to top button