

खेड (जि.रत्नागिरी ) : पुढारी वृत्तसेवा
आगामी काळात होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या नवीन प्रभाग रचनेनुसार शहराची 10 वॉर्डांमध्ये विभागणी होणार आहे. प्रत्येक प्रभागातून दोन सदस्य असे वीस सदस्य पालिकेच्या सभागृहात नागरिकांतून निवडले जातील. त्यामुळे शहरात उत्सुकता वाढली असून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.खेड शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 16 हजार 892 आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती या प्रवर्गाची लोकसंख्या 1083, तर अनुसूचित जमाती लोकसंख्या 128 आहे.
पालिकेच्या सभागृहाचा पाच वर्षांचा कालावधी उलटून गेल्याने खेडच्या उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांची पालिकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर निवडणूक आयोगाने आगामी पंचवार्षिक निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नवीन निर्णयामुळे शहरात नवीन तयार होणार्या सर्व वॉर्डांमध्ये प्रत्येकी दोन लोकप्रतिनिधी निवडून द्यावे लागणार आहेत. वॉर्ड क्रमांक 1मध्ये 1638 लोकसंख्या असून अनुसूचित जातीचे 42, तर अनुसूचित जमातीचे हेच नागरिक वास्तव्य करतात. प्रभाग 2 मध्ये 1891 लोकसंख्या असून अनुसूचित जातीचे 74 व अनुसूचित जमातीचे आज 5 लोक वास्तव्य करतात. प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1655 एकूण लोकसंख्या असून अनुसूचित जातीचे 56, तर जमातीची 23 लोकसंख्या आहे.
प्रभाग क्रमांक चारमध्ये 1637 लोकसंख्या असून अनुसूचित जातीचे सर्वाधिक 431 लोक या वॉर्डात वास्तव्य करतात, तर अनुसूचित जमातीचे 15 नागरिक येथे आहेत. वॉर्ड क्रमांक पाचमध्ये 1709 लोकसंख्येमध्ये अनुसूचित जातीचे 172 आणि अनुसूचित जमातीचे 19 लोक वास्तव्य करतात. वॉर्ड क्रमांक सहामध्ये 1718 लोकसंख्या असून अनुसूचित जातीचे 14 लोक वास्तव्याला आहेत. वॉर्ड क्र. 7 मध्ये 1597 लोकसंख्येत 227 अनुसूचित जाती, तर 20 अनुसूचित जमातीची संख्या आहे. वॉर्ड क्र. 8 मध्ये 1583 लोकसंख्या असून 43 अनुसूचित जाती व 4 अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. 1851 लोकसंख्येच्या वॉर्ड क्रमांक 9 मध्ये अनुसूचित जातीचे 24 व अनुसूचित जमातीचे 12 लोक वास्तव्य करतात. वॉर्ड क्रमांक 10 मध्ये 1613 लोकसंख्या असून अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या नाही.
सद्यस्थितीत प्रस्तावित वॉर्ड रचनेनुसार वॉर्ड क्रमांक दोन हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला वॉर्ड असून सर्वात कमी लोकसंख्या वॉर्ड क्रमांक 10 मध्ये आहे. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये सुमारे एक चतुर्थांश लोकसंख्या मागासवर्गीय वर्गाची आहे.