चिकोडी : करोशीत सापडले पाकचे चलन | पुढारी

चिकोडी : करोशीत सापडले पाकचे चलन

चिकोडी; पुढारी वृत्तसेवा : पाकिस्तान देशाची नोट (चलन) करोशीत (ता. चिकोडी) सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी चिकोडी पोलिस तपास करत आहेत.

याबद्दल अधिक माहिती अशी, गुरुवारी सकाळी 11 च्या दरम्यान एका युवकाला करोशी बसस्थानकावर रस्त्यावर पडलेली एक नोट मिळाली. त्याने पाहिले असता नोटेवर पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे छायाचित्र असून त्यावर स्टेट बँक ऑफ पाकिस्तान असे इंग्रजीत व इतर मजकूर उर्दू भाषेत छापण्यात आल्याचे त्याच्या निदर्शनास आले. ही नोट 10 रुपयांची आहे. पाकिस्तानची नोट सापडल्याने सदर तरुणाने चिकोडी पोलिस स्थानक गाठून पीएसआय यमनाप्पा मांग यांच्याकडे ती नोट सुपूर्द केली व सविस्तर माहिती दिली.

नागरिकांतून आश्चर्य

करोशी गावात पाकिस्तानी नोट मिळाल्याने नागरिकांसह पोलिस खाते चक्रावून गेले आहे. करोशी गाव हे 12 ते 14 हजार लोकसंख्येचे असून सर्व जाती-धर्माचे लोक राहत आहेत. येथील धार्मिक स्थळांना विविध भागातून लोक येत असतात. गावात चक्क पाकिस्तानी चलन मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलिसांकडून गांभीर्याने तपास

ही बाब गांभीर्याने घेऊन चिकोडी पोलिस व गुप्तचर खात्याने तपास सुरू केला आहे. करोशी गावात पाकिस्तानहून कोणी आले आहे का, सदर नोट कुठून आली, यामागे मोठे रॅकेट आहे का, याविषयी पोलिस तपास करत आहेत.

Back to top button