कणकवली : अजित सावंत
वैभववाडी तालुक्यातील करूळ (गगनबावडा) घाटमार्ग कोल्हापूर आणि कोकणला जोडतो. सर्वाधिक वर्दळीचा घाटमार्ग म्हणून त्याची ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी तळेरे ते कोल्हापूर हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. आता या घाटरस्त्याचा वनवास संपून त्याला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा होती; मात्र ती धुळीला मिळाली आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला, म्हणजे केवळ नवे नाव मिळवले, दशा तीच राहिली, अशी स्थिती आहे!
घाटमार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ढासळलेले संरक्षक कठडे आणि धोकादायक स्थितीत असलेल्या दरडी यामुळे या मार्गावरून जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. घाटाच्या दुरवस्थेमुळे गेल्या महिन्यापासून कोकणातून गगनबावड्याकडे होणारी ऊस वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली, फोंडाघाट, करूळ आणि भुईबावडा असे चार घाटमार्ग आहेत. यातील सर्वाधिक वर्दळ ही करूळ घाटमार्गावरच असते. साडेअकरा कि.मी.चा हा घाटमार्ग आहे. नागमोडी वळणे, खोल दर्या, मोठमोठे डोंगर अशा भौगोलिक रचनेतून काढण्यात आलेला हा घाटमार्ग तसा अवघडच आहे.
गेल्या पावसाळ्यात अनेकवेळा दरडी कोसळून आणि संरक्षक कठडे ढासळून हा घाटमार्ग ठप्प झाला होता. सिंधुदुर्गातून कोल्हापूरकडे किंवा कोल्हापूरहून सिंधुदुर्गकडे जाणारी-येणारी सर्वाधिक वाहतूक ही याच घाटमार्गाने होते. सध्याही वाहतूक कशीबशीच सुरू आहे. ऊस वाहतुकीच्या गाड्या मात्र पूर्णपणे थांबवण्यात आल्या आहेत. ऊस उत्पादक शेतकर्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला घाटमार्ग दुरुस्तीसाठी अल्टिमेटम दिला आहे. ऊस वाहतूक थांबल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांचे नुकसान होत आहे.
दरडी काढल्या जाणार
.घाटमार्गाच्या रुंदीकरणात धोकादायक दरडी काढल्या जाणार आहेत. वरच्या बाजूने अधिकाधिक संरक्षक भिंती बांधल्या जाणार आहेत. जेणेकरून पावसाळ्यात वारंवार घाटमार्ग ठप्प होण्याचा प्रश्नच येणार नसल्याचे महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्यांनी सांगितले.