

कराड; पुढारी वृत्तसेवा : विरोधकांकडून सातत्याने राज्य शासन अस्थिर आहे. महिनाभरात सरकार पडेल, असे सांगितले जात आहे; मात्र आमच्यासोबत 170 आमदार आहेत, हे लक्षात ठेवा, असे सांगत हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामोल्लेख टाळत उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांना दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी कराडमध्ये नागरी सत्कार झाला. या सत्कारास उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना हे आव्हान दिले आहे. सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार शहाजी पाटील, आमदार महेश शिंदे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, राज्यात 1100 ग्रामपंचायतीपैकी 700 ग्रामपंचायतीत शिवसेना-भाजपा युतीला विजय मिळाला आहे. विरोधकांकडून सातत्याने अपप्रचार केला जात आहे. मात्र आम्ही कामातून उत्तर देत आहोत, असे सांगत खोके कोठून कोठे जात होेते हे माझ्याइतके चांगले कोणाला ठाऊक असणार? तुमचे खोके बंद झाले म्हणून तडफडत आहात, असे म्हणत खोके कोठून कोठे जात होते हे सांगायला लावू नका, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी नामोल्लेख टाळत उद्धव ठाकरे यांना दिला. सरकार अस्थिर आहे असा अपप्रचार करणार्या विरोधकांना हिंमत असेल तर आमचे सरकार पाडून दाखवा, असे आव्हान देत माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा गेलेली नाही. आजही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करत आहे. जनतेचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच असल्याने तुमच्या पायाखालची वाळू सरकत आहे, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान किंवा तुलना कोणाशीही कोणीही करू शकत नाही, आणि ते कोणीही मान्य करणार नाही. कोणाच्याही अशा विचारांशी आम्ही सहमत नाही. यामध्ये माझी व उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आम्ही जाहीर केली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न हा आमचा व या राज्यातील जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्यातील एकही गाव इकडून तिकडे जाणार नाही, याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.