

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने अलीकडेच एक नवा लघुग्रह शोधून काढला आहे. हा लघुग्रह 2046 मध्ये पृथ्वीला धडकू शकतो अशा स्थितीत आहे. मात्र, ही धडक होण्याची शक्यता अतिशय कमी असल्याचे 'नासा'ने म्हटले आहे. हा लघुग्रह 2046 च्या 'व्हॅलेंटाईन डे'ला म्हणजेच 14 फेब्रुवारीला पृथ्वीला धडकण्याची भीती आहे! त्यामुळे पृथ्वीला भेटण्यासाठी येणार्या लघुग्रहाची ही 'प्रेमळ भेट' ठरेल की नाही हे आताच सांगता येणे कठीण आहे.
युरोपियन स्पेस एजन्सीच्या आकडेवारीनुसार या लघुग्रहाची पृथ्वीला धडक होण्याची शक्यता 625 मध्ये एक इतकी कमी आहे. 'नासा'च्या अनुमानानुसार ही शक्यता 560 मध्ये एकच आहे. 'नासा'ची जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी अंतराळातून पृथ्वीच्या दिशेने येणार्या कोणत्याही धोक्याची निगरानी करते. या अवकाशीय शिळेचे नाव '2023 डीडब्ल्यू' असे ठेवण्यात आले आहे. 'नासा'च्या रिस्क लिस्टमध्ये असलेला हा एकमेव खगोल आहे. हा लघुग्रह ऑलिम्पिकच्या स्विमिंग पूलइतक्या आकाराचा आहे. 'नासा'चे इंजिनिअर डेव्हिड फारनोचिआ यांनी सांगितले की या लघुग्रहाविषयी अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. तो पृथ्वीला धडकण्याची शक्यता अगदीच कमी आहे.