हवाई प्रवास आणखी महागण्याची दाट शक्यता

हवाई प्रवास आणखी महागण्याची दाट शक्यता
Published on
Updated on

मुंबई : पुढारी डेस्क : विमान इंधनाचे (एटीएफ-एव्हिएशन टर्बाईन फ्युएल) दर बुधवारी तब्बल 18 टक्क्यांनी वाढून एक लाखांपलिकडे झेपावले. जेट इंधन दरात या वर्षातील पहिल्या अडीच महिन्यांतच तब्बल सहाव्यांदा वाढ झाली. या दरवाढीच्या परिणामी हवाई प्रवास आणखी महागण्याची दाट शक्यता आहे.

एटीएफचे दर बुधवारी प्रति किलोलिटर 17,135.63 रुपये म्हणजे 18.3 टक्क्यांनी उसळून 1 लाख 10 हजार 666 रुपये 29 पैशांवर पोहोचले. विमान इंधनाचे दर पहिल्यांदाच 1000 लिटरमागे 1 लाख रुपयांवर गेले आहेत. या दरात प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला सुधारणा केली जाते. या सुधारणेसाठी मागील पंधरवड्यातील आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या बेंचमार्क दरांचा आधार घेतला जातो. यापूर्वी, ऑगस्ट 2008 मध्ये एटीएफ दराने किलोलिटरमागे 71,028.26 रुपयांचा उच्चांक नोंदवला होता. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर 147 डॉलर्स होता.

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याच्या भीतीपोटी आंतरराष्ट्रीय बाजारातील दराने बॅरलमागे 140 डॉलर्स असा 14 वर्षांतील नवा उच्चांक नोंदवला. नंतर हे दर प्रतिबॅरल 100 डॉलर्सपर्यंत कमी झाले. मात्र, युद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्‍चिततेच्या परिणामी एटीएफ दराने विक्रमी उसळी घेतली.

एटीएफच्या दरात जानेवारीपासून सहा वेळा वाढ झाली. ही वाढ जवळपास 50 टक्के म्हणजे प्रति किलोलिटर 36,643.88 रुपये एवढी प्रचंड आहे. विमान वाहतूक कंपन्यांच्या संचालन खर्चात इंधन खर्चाचा वाटा तब्बल 40 टक्के असतो. हा खर्च वाढल्यामुळे विमानाचे तिकीट दरही वाढण्याची चिन्हे आहेत.

एटीएफ दरात 18 टक्क्यांची उच्चांकी वाढ

एटीएफ दरवाढीचा थेट परिणाम प्रवाशांवर होईल. विमान कंपन्या वाढीव खर्चाचा भार भाडेवाढीच्या स्वरूपात प्रवाशांवर टाकतील हे निश्‍चित, असे मार्टिन कन्सल्टिंगचे मुख्याधिकारी मार्क मार्टिन म्हणतात. एकंदर पाहता, कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून मंदीच्या सावटाखाली असलेल्या हवाई वाहतूक क्षेत्राला जलदगतीने उभारी मिळण्याची शक्यता कमीच दिसते. 2020-21 मध्ये भारतातील एअरलाईन्सना 19,564 कोटी आणि विमानतळांना 5,116 कोटींचा तोटा झाला. 23 मार्चपासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक या 27 मार्चपासून पुन्हा सुरू होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news