

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : मुंबई व दिल्लीतील बडे नेते, प्रसिद्ध व्यक्ती आणि प्रमुख व्यावसायिक यांच्या हत्यासत्रासाठी स्फोटके आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज 'स्पेशल युनिट' डॉन दाऊदने तयार केले आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आपल्या एफआयआरमध्ये केला असून, हा कट हाणून पाडण्यासाठी मुंबईसह देशभर छापे टाकण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईतही असे छापे पडले. त्याचा उलगडा आता होऊ लागला आहे.
मुंबई बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तानच्या आश्रयाला असलेल्या 'डी गँग'च्या एका मोठ्या कटाची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या हाती लागल्यानंतर एनआयएने या कटाचा संपूर्ण छडा लावला.
एनआयएच्या माहितीनुसार दाऊदला त्याच्या या स्पेशल युनिटच्या माध्यमातून भारतात हल्ले करायचे आहेत. दिल्ली व मुंबईत मोठ्या घातपाती कारवाया करण्यावर त्याचा भर राहील. देशाच्या विविध भागांमध्ये हिंसाचार माजविण्याचा उद्देश यामागे आहे. पाकिस्तानकडून त्याला प्रोत्साहन असून, त्यासाठी दाऊदचे देशातील सिंडिकेट वापरण्यात येणार आहे.
ईडीच्या कोठडीत इकबाल कासकर
एनआयएच्या या खळबळजनक माहितीपूर्वी एक दिवसआधी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर याला ताब्यात घेतले आहे. 'मनी लाँडरिंग'च्या एका प्रकरणात 24 फेब्रुवारीपर्यंत इकबालची चौकशी चालणार आहे. ईडीने दाऊद आणि त्याच्या बगलबच्चांविरुद्ध अलीकडेच मनी लाँडरिंगचा गुन्हा नोंदविला आहे. ईडीच्या मते दाऊद आणि त्याचे साथीदार दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवत आहेत.
इक्बालविरोधात खंडणीचा गुन्हा
सप्टेंबर 2017 मध्ये इक्बाल कासकर, मुमताज अजाज शेख आणि इसरार जमील सय्यद यांच्याविरोधात एका बिल्डरने खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. 2015 मध्ये एका बिल्डरने जमील सय्यदची भेट घेतली होती. आपण दाऊदचा भाऊ असल्याचे सय्यदने त्यावेळी म्हटले होते. सय्यदने संबंधित बिल्डरचे इक्बाल कासकरशीदेखील बोलणे करुन दिले होते. तसेच जर त्याने खंडणीची रक्कम दिली नाही तर त्याला ठार मारण्याची धमकीही दिली होती, अशी माहिती ईडीचे सहसंचालक डीसी नाहक यांनी दिली.
आयपीएस अधिकारी गजाआड
लष्कर ए तोयबाला गुप्त माहिती देणारा आणि गॅलेंट्री अॅवॉर्ड विजेता हिमाचल प्रदेश कॅडरचा आयपीएस अधिकारी अरविंद दिग्वीजय नेगी याला एनआयएने शुक्रवारी अटक केली. विशेष म्हणजे हुर्रियत टेरर फंडींग प्रकरणात उल्लेखनीय कामगिरी करण्याबद्दल नेगीला गॅलेंट्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. भारतीय गुप्तचर संस्थांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरमध्ये नेगी याच्या घरावर एनआयएने छापे घातले. या छाप्यात नेगीची भूमिका संशयास्पद वाटल्याने नेगीला ताब्यात घेण्यात आले.
पाकिस्तानने पेरले हेर
राजस्थानातील नशिराबाद लष्करी शिबिरातून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी मोहम्मद युनूस याला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद युनूस हा पार्किंगमध्ये कामावर होता. व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून तो लष्करातील गोपनीय माहिती पाकिस्तानात पाठवत होता. त्याबदल्यात त्याला पैसे मिळत होते. 'आयबी'च्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्याला जयपूर मुख्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. मोहम्मद युनूसचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.