

माळशिरस; अनंत दोशी : कोरोनानंतर दोन वर्षांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा चालू झाला आहे. या सोहळ्याबरोबर असणार्या छोट्या व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून पालखी सोहळ्यातून दोन वर्षांनंतर आर्थिक उत्पन्न मिळणार आहे व वारीही घडणार आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा सर्वांसाठीच एक पर्वणी असते. यात अनेक प्रकारचे नागरिक, व्यावसायिक, भक्त सामील होत असतात. हा सोहळा बावीस दिवस चालत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तांबरोबरच अनेक लहान व्यावसायिक आपला व्यवसाय करण्यासाठी सामील होत असतात. त्यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. यात चहा हॉटेल, लहान मुलांची खेळणी, फुगे, मिठाईची दुकाने, मनोरंजनाचे पाळणे, इतर साधने आदी व्यावसायिक असतात. हे व्यावसायिक पालखी सोहळ्याबरोबर आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पालखीच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी व सोहळ्याबरोबर राहून आपला व्यवसाय करतात.
काही व्यावसायिक तर आपले कुटुंबच बरोबर घेऊन येतात. या व्यवसायापासून या लहान व्यावसायिकांना चांगले अर्थिक उत्पन्न मिळत असल्याने अनेक व्यावसायिक या सोहळ्यात सामील होतात. काही व्यावसायिक तर गेली अनेक वर्षे या सोहळ्याबरोबर आपल्या व्यवसायासह येत असतात. पालखी सोहळ्यातील आर्थिक उत्पन्नामुळे व्यावसायिकांच्या कुटुंबाला चांगला आर्थिक भार लागत होता.
गेली दोन वर्षे पालखी सोहळा कोरोनामुळे रहित झाला. त्यामुळे पालखी सोहळ्याबरोबर येत असलेले छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले. काहीजण तर आपल्या गावात मिळेल ते काम करुन आपल्या कुटुंबाची उपजीविका करीत असल्याचे चित्र होते. त्यामुळे यंदा पालखी सोहळा सुरू झाल्याने अनेक लहान व्यावसायिक, मनोरंजनाची साधने असलेले पालखी सोहळ्यासोबत आहेत.
अनेक लहान व्यावसायिकांसाठी पालखी सोहळा एक चांगले उत्पन्नाचे साधन असल्याने सोहळ्याबरोबर व पंढरपूर येथे चांगला व्यवसाय होत आहे. या व्यवसायाबरोबरच आपल्याबरोबर कुटुंब असेल तर वारी पूर्ण केल्याचा आनंदही मिळत असतो. त्यामुळे व्यवसायाबरोबर वारीही होते व त्याचे आध्यात्मिक समाधान मिळते.
पालखी सोहळा ज्या गावात विसावतो व मुक्काम असतो तेथील नागरिकांना या व्यावसायिकांकडून अनेक वस्तू खरेदी करण्यात एक वेगळाच आनंद मिळत असतो. फुगे, लहान मुलांची खेळणी घेण्याचाही कल असतो. त्यामुळे पालखी सोहळा हा वारकरी भाविकांबरोबरच पालखीसोबत असलेल्या लहान व्यावसायिक, मनोरंजनाची साधने असलेल्यांसाठी एक पर्वणीच असते.
गेली दहा वर्षे आम्ही पालखी सोहळ्याबरोबर व्यवसाय करीत येतो. पंरतु, गेली दोन वर्षे पालखी सोहळा नसल्याने व्यवसाय झाला नाही. त्यामुळे आर्थिक ओढाताण झाली. पालखी सोहळ्याच्या पंचवीस दिवसांत व्यवसायातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. कुटुंबालाही आधार मिळतो व वारीही होते. त्याचे समाधान मिळते.
– सागर पवार,
खेळणी विक्रेता, परभणी