

बार्शी; पुढारी वृत्तसेवा : येथे एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोड्या झाल्या असून, एकूण तीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.
धर्माधिकारी प्लॉट, गाडेगाव रोड, बार्शी येथे एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या घरात प्रवेश करून सोन्याचे दागदागिने व रोख रक्कम अशा एकूण 2,91,000 रुपयांची चोरी केली आहे. याबाबत विष्णू विठ्ठल बारगजे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
बारगजे यांनी फिर्यादीत म्हटले, नातेवाईक घरी आल्याने सर्वजण एकाच बेडरूममध्ये झोपले होते. दुसर्या बेडरूममध्ये लोखंडी कपाटामध्ये दागदागिने व रुपये होते. सकाळी लवकर उठून मुलाला कपडे आणण्याकरिता बेडरूममध्ये पाठवले असता बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याने बारगजे यांनी पाठीमागे जाऊन पाहिले असता खिडकीची लोखंडी सळई बाजूला काढलेली दिसली. कपाटात ठेवलेले दागिने व रुपये दिसून न आल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले.
दरम्यान, अशाच प्रकारे शेजारच्या सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश बाबुराव क्षीरसागर यांच्या घरातही चोरी झाल्याचे दिसून आले.
या दोन्ही चोर्यांमधून सुमारे 8 तोळे सोन्याचा ऐवज, तर 200 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण,जुनी नाणी व रोख रक्कम चोरण्यात आली. अधिक तपास शहर पोलिस करीत आहेत.