

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिकेजवळील असलेल्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा मल्हार हा आंतरमहाविद्यालयीन कार्यक्रम 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार आहे. यंदा 'आय ऑफ द स्टॉर्म' ही थीम असून या थीम व लोगोचे अनावरण रविवारी करण्यात आले.
आशिया खंडातील दुसरा सर्वात मोठा आंतरमहाविद्यालयीन कार्यक्रम, मल्हार सज्ज आहे. पुन्हा एकदा सर्वांना चकित करायला. सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांद्वारा 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आयोजित केला जाणार आहे. या फेस्टमध्ये अनेकानेक दिग्गज कलाकार मंडळी हजेरी लावतात.आतापर्यंत ध्रुव सेहगल,शर्मिला टागोर,अमृता राव,अनुपम खेर,नसरुद्दीन शाह असे अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे.
संपूर्ण मुंबई विभागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मल्हारद्वारे आपल्या कलागुणांना वाव व नवीन गोष्टी शिकायची संधी मिळते. यावर्षी 'आय ऑफ द स्टॉर्म ' अशी थीम आहे.या थीमच्या माध्यमातून असा संदेश देण्यात येत आहे की,जीवनात आपल्याला अनेक वादळांचा सामना करावा लागतो. यामध्ये आपली वेगवेगळ्या स्तरावर परीक्षा घेतली जाते.सामान्यतः वादळ या शब्दाचा अर्थ नकारात्मक दृष्टीने घेतला जातो.
या अशांततेच्या वातावरणात शांतता शोधून त्या वादळावर मात करणे म्हणजे खरे यश होय.वादळाच्या केंद्रस्थानी जे शांत आणि सकारात्मक क्षेत्र आहे, ते म्हणजे या वादळाचा डोळा.नकारात्मक गोष्टींमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असा मुख्य संदेश मल्हार देणार आहे.'मल्हार'मध्ये सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.