सॅटेलाईट टॅगिंग कासवे किनार्‍याच्या दिशेने..!

सॅटेलाईट टॅगिंग कासवे किनार्‍याच्या दिशेने..!
Published on
Updated on

दापोली : प्रवीण शिंदे :  सॅटेलाईट टॅगिंग केलेल्या ऑलिव्ह रिडले मादी कासवांचा परतीचा प्रवास सुरू असून, हे कासव मूळ ठिकाणी म्हणजे वेळास, आंजर्ले, गुहागर येथे येतील, असे त्यांच्या सध्याच्या लोकेशनवरून स्पष्टपणे दिसत आहे. खोल समुद्रातून आता ही कासवे समुद्र किनार्‍याच्या जवळपास आहेत. कासवांच्या सध्याच्या समुद्रात फिरण्याचा वेग आणि बदलते मार्ग हे मान्सूनचे आगमन जवळ आल्याचे संकेतही देत असल्याचे निरीक्षणांती अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.

समुद्र किनारी अंडी घालण्यासाठी आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या पाच मादी कासवांना मँग्रोव्ह फाऊंडेशन आणि भारतीय वन्यजीव संस्थान (डब्लूआयआय)ने त्यांच्या पाठीवर सॅटेलाईट ट्रान्समीटर' लावून चार महिन्यांपूर्वी समुद्रात सोडले होते. वेळास किनार्‍यावरून 'प्रथमा', आंजर्ल्यातून 'सावनी' तर गुहागरातून 'रेवा', 'लक्ष्मी', 'वनश्री' या कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावून पुन्हा समुद्रात सोडले होते. यामधील 'लक्ष्मी' वगळता इतर चार मादी कासवांचा समुद्री प्रवास सुरू आहे. कासवांच्या समुद्रातील हालचालींची माहिती मँग्रोव्ह फाऊंडेशन'चे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे घेत आहेत.

सॅटेलाईट टॅगिंग केलेली चार मादी ऑलिव्ह रिडले कासवे त्यांचे सागरी भ्रमणमार्ग याचा वन विभागाचे कांदळवन कक्ष आणि भारतीय वन्यजीव मंडळाकडून अभ्यास सुरू आहे. अभ्यासात प्रथमा, सावनी, वनश्री, रेवा या चार मादी ऑलिव्ह रिडले कासवांनी सॅटलाईट टॅगिंग केल्यानंतर गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील कर्नाटक राज्यातील समुद्रापर्यंत प्रवास केल्याचे दिसून आले.

'सावनी' व 'रेवा' एकमेकांपासूनच जवळच्या अंतरावर आहेत. या दोघी कदाचित एकाच ठिकाणी येतील, असा अंदाज भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. आर. सुरेशकुमार यांनी अगोदरच मांडला होता. प्रथमाही अपेक्षेनुसार सातत्याने दक्षिणेकडील समुद्राच्या दिशेने जात आहे. या तिघी कदाचित एकाच ठिकाणी जमतील, अशीही शक्यता आहे.

समुद्रात ज्या ठिकाणी अन्न असते तिथे कासवं लांबच्या पल्ल्याचाही प्रवास करतात. टॅगिंग केलेल्यांपैकी प्रथमाने बराच काळ गुजरातच्या किनारपट्टीत वास्तव्य केल्यानंतर राज्याच्या किनारपट्टीत परतण्यासाठी वेगाने प्रवास केला. प्रथमा ही सुरुवातीपासून समुद्रभ्रमंतीत वेगवान आहे. यातील रेवा कर्नाटक राज्यात पोहोचल्यानंतर सुरुवातीला 250 किलोमीटर किनारपट्टीपासून लांब होती. आता हे अंतर 100 किलोमीटर किनारपट्टीच्या अंतरावर येऊन पोहोचले.

सावनीनेही कर्नाटक राज्य गाठले. प्रथमा सध्या देवगड आणि विजयदुर्ग किनारपट्टीपासून 60 किलोमीटर समुद्रात आहे. सावनी आणि रेवा एकमेकांपासून दूर आहेत. मात्र, त्यांचे ठिकाण एकाच भागात आहे. दोघीही कारवार आणि उडूपी या कर्नाटक राज्यातील समुद्रकिना-र्‍यांपासून 100 किलोमीटर आत आहेत. वनश्री अगोदरपासूनच दक्षिण कोकणातच ठाण मांडून आहे. प्रथमाने मालवणच्या समुद्रकिनार्‍याजवळ सध्या समुद्रभ्रमंती सुरु केली आहे.

सावनी, रेवा कर्नाटकात

गेल्या पंधरवड्यापूर्वी गुजरातच्या खोल समुद्रातून महाराष्ट्र किनारपट्टीजवळ पोहोचलेल्या प्रथमा या मादी ऑलिव्ह रिडले कासवाने आता दक्षिण कोकण गाठले आहे, तर त्याजवळ फिरणार्‍या 'सावनी'ने आता कर्नाटक राज्यातील समुद्र गाठला आहे. 'रेवा' हे ऑलिव्ह रिडले मादी कासव कर्नाटक समुद्राजवळच आढळून येत असताना आता खोल समुद्रातून हळूहळू किनार्‍याच्या दिशेने सरकत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news