सीईटी अभावी व्यावसायिक महाविद्यालये अडचणीत

सीईटी अभावी व्यावसायिक महाविद्यालये अडचणीत
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) होेणार्‍या 15हून अधिक प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. या परीक्षांच्या गुणांवरच विविध 20 अभ्यासक्रमांचे प्रवेश होतात. मात्र परीक्षांच्या तारखाच नसल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षाची वाटही बिकट होऊन बसली आहे.

यंदा प्रवेश पूर्व परीक्षाच न झाल्याने प्रवेश कसे पूर्ण होणार, याचा घोर राज्यातील शिक्षण संस्थांच्या जीवाला लागला आहे. गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकीसह तंत्रनिकेतन आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या निम्म्या जागा रिक्त राहात आहेत. त्यात कोरोनामुळे राज्यातील संस्थाचालकांनी धास्ती घेतली आहे. प्रवेशच होत नसल्याने व्यावसायिक महाविद्यालये बंद करण्याचा विचार काही जण करीत आहेत.

यंदा अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने स्पष्ट केले आहे. असे असतानाही अद्याप सीईटी परीक्षाच झालेल्या नाहीत.

अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी सोबतच लॉ, बीएड, हॉटेल मॅनेजमेन्ट, आर्किटेक्चर, एमबीए, एमसीए अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना सीईटी गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जातात.

या अभ्यासक्रमांच्या राज्यभरात असलेल्या विविध संस्थातील सुमारे चार लाख जागांवर प्रवेश हे या परीक्षांच्या गुणावरच दिले जातात, यंदा या परीक्षा कधी होणार याबाबत स्पष्टता नाही.

तब्बल 15 सीईटीसाठी तब्बल 7 लाख 74 हजार 859 राज्यभरातून तसेच राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनी नोंदणी या वर्षासाठी केली आहे. दररोज अनेक विद्यार्थी सीईटी कार्यालयात येऊन चौकशीसाठी फेर्‍या मारत आहेत. यासंदर्भात संकेतस्थळावरही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे सीईटी सेलचा बोजवारा उडाला आहे.

प्रवेश परीक्षा कक्षाने जर वेळेत वेळापत्रक जाहीर केले नाही तर भविष्यातील सर्वच वेळापत्रक कोलमडणार आहे. दहावी आणि बारावीच्या मूल्यांकन निकालाचा फायदा व्यावसायिक अभ्यासक्रमातील महाविद्यालयांना होईल अशी शक्यता होती. शहरी सोडून अन्य ग्रामीण भागात असलेली अभियांत्रिकी, व्यवस्थापन, पॉलिटेक्निक यासह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी विद्यार्थी येत नाहीत.

कोरोनामुळे तर गेल्यावर्षी प्रवेशाला मोठा फटका बसला, पूर्ण तुकडी विद्यार्थी मिळाले नसल्याने ग्रामीण भागातील संस्थाचालकांतून नाराजी होती. प्रवेश फेरी लांबवली तरी प्रवेश झाले नाहीत. परिणामी जिल्हा ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांवर रिक्त जागांचे संकट ओढवत आहे.

शैक्षणिक सत्रच कोलमडणार

सीईटी सेलकडून दोन दिवसांत वेळापत्रक जाहीर झाले तरी परीक्षेची तारीख किमान 15 दिवसांनंतरची ठरवावी लागणार आहे. त्यानंतर निकाल लावून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी 25 दिवस लागतील. यामुळे एआयसीईटीने दिलेले पहिल्या प्रवेश फेरीच्या तारखेचे बंधन पाळणे प्रवेश परीक्षा कक्षाला शक्य नाही.

कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरनेही 1 ऑक्टोबरपासून वर्ग सुरू करण्याबाबत सूचना केली आहे. अभ्यासक्रम नियंत्रण करणार्‍या संस्थांनी वेगवेगळी मुदत दिली आहे. तीत प्रवेश परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे सद्यस्थितीत कसे जमणार, अशी विचारणा संस्था करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news