

वॉशिंग्टन : अमेरिकेमधील एका 24 वर्षीय शिक्षिकेची 52 वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. मागील पाच दशकांहून अधिक काळापासून हा खटला सुरू होता. या महिलेच्या मृतदेहाजवळ एक गिगारेटचं बट (म्हणजेच सिगारेट पिताना मागील बाजूला असलेला कापसाचा वापर करून बनवलेला भाग) सापडलं होतं. सिगारेट बटवर सापडलेल्या डीएनएच्या नमुन्यांच्या आधारे पोलिसांनी तब्बल 52 वर्षांनंतर ही केस पूर्णपणे सोडवली आहे. या सिगारेटच्या मदतीने पोलिसांनी या 24 वर्षीय रीटा कर्रन या महिलेची हत्या करणार्याचा शोध घेतला. रीटाची हत्या तिच्याशेजरी राहणार्या व्यक्तीनेच केली होती. गळा चिरून त्याने रीटा यांची हत्या केली होती.
रीटा या 19 जुलै 1971 रोजी त्यांच्या रुममेट्सला त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आल्या. या प्रकरणामध्ये आरोप सिद्ध झालेला विलियम डेरुस हा रीटा राहत असलेल्या इमारतीमध्येच वास्तव्यास होता. मात्र त्यावेळी कधीच त्याच्यावर पोलिसांनी संक्षय घेतला नव्हता. पोलिसांच्या गुप्तहेर विभागाचे कमांडर जिम ट्राइब यांनी, 'डेरुस आणि त्याची पत्नी मिशेल यांनी त्यावेळी जबाब नोंदवताना हत्या झाली त्या दिवशी आम्ही घरीच होतो; मात्र आम्हाला काहीही संशयास्पद ऐकू आलं नाही किंवा दिसलं नाही, असं सांगितलं होतं,' अशी माहिती दिली. नंतर या प्रकरणाचा तपास थांबवण्यात आला. मात्र या प्रकरणात तपास करणार्या अधिकार्यांना एक सिगारेटचा तुकडा घटनास्थळी आढळून आला.
या सिगारेटच्या तुकड्यानेच या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोहचण्यास मदत केली. हत्या करणारा विलियम नंतर आपल्या पत्नीली सोडून थायलंडला गेला. तो 1974 साली पुन्हा अमेरिकेत आला. सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये तो वास्तव्यास होता. त्यानंतर 1989 साली तो ड्रग्सच्या आहारी गेला. सॅन फ्रॅन्सिस्कोमधील एका हॉटेलमध्येच त्याचा मृत्यू झाला. 2014 साली सिगरेटच्या डीएनए प्रोसेसिंगला रेकॉर्डमध्ये जमा करण्यात आलं. डीएनए रेकॉर्डमध्ये असं दिसून आलं की रीटाची हत्या झाली त्या दिवशी तिने परिधान केलेल्या जॅकेटवरील नमुन्यांपैकी डीएनएचा एक नमुना डेरुसच्या डीएनएच्या एका सिक्वेन्सशी मॅच झाला.