

गतवर्षी पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी
दिनांक 7 डिसेंबर, 1985 हा दिवस आमच्या आणि 'पुढारी' परिवाराच्या जीवनातील अत्यंत भाग्याचा दिवस होता. कारण, या दिवशी आबांना 'डी. लिट्' ही सर्वोच्च सन्मानाची पदवी शिवाजी विद्यापीठानं जाहीर केली होती! साहजिकच समाजाच्या सर्व स्तरांतील आबांच्या सुहृदांना आनंदाचं भरतं आलं. कारण, आबांना 'डी. लिट्' मिळणं हा काही एका व्यक्तीचा सन्मान नव्हता, तर हा पत्रकारितेच्या आणि समाजकार्यातील एका युगाचा सत्कार होता. आबांना मिळालेली डॉक्टरेट म्हणजे स्वतः अल्पशिक्षित राहूनही समाजात लोकशिक्षणाचा जागर मांडणार्या आणि समाजमन सुशिक्षित व्हावं यासाठी पत्रकारितेचा महायज्ञ प्रज्वलित करणार्या एका तपस्व्याच्या ज्ञानसाधनेला बुद्धिमंतांकडून दिलेली मानवंदनाच होती.
आबांना डॉक्टरेट मिळाल्याच्या सुवर्णक्षणाचे साक्षीदार झाल्याबद्दल आमच्या सर्व कुटुंबीयांना आणि त्याबरोबर 'पुढारी' परिवारालाही अवर्णनीय आनंद होणं हे तर साहजिकच होतं. त्यांचा मुलगा म्हणून माझा ऊर अभिमानानं भरून आला होता, हे तर त्याहूनही साहजिक होतं. परंतु; आबांच्या या सन्मानाचा सन्मान जेव्हा सामाजिक प्रतिनिधित्व करणार्या विचारवंत व्यक्ती करतात, तेव्हा त्या सन्मानाची उंची अधिकच वाढते आणि त्याची समर्थकताही ध्यानी येते. कारण, हे असे विचारवंत एका अर्थानं 'सोशल जस्टिस'च असतात, म्हणूनच त्यांच्या 'जजमेंट्स'ना फार मोठं मूल्य असतं.आबांना 'डी. लिट्'ची घोषणा झाल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार आणि थोर समाजवादी विचारंत नरूभाऊ लिमये यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी तर आहेच; पण ती प्रातिनिधिकही आहे. ते म्हणाले होते,
"कोल्हापूरसारख्या शहरात वृत्तपत्रं, साप्ताहिकं आणि दैनिकं यांना एवढी सुगी आलेली आहे की, ती नेमकी किती आहेत, हे सांगण्यासाठी एखादा मोजणीदारच नेमावा लागेल. परंतु; कोल्हापुरात चांगलं दैनिक कुठलं? असं जर विचारलं, तर गणपतरावांचा 'पुढारी' हे नाव दहापैकी नऊ वाचक तरी छातीठोकपणे सांगतील. हे श्रेय केवळ आणि केवळ गणपतराव जाधव यांचंच आहे. त्यांनी आपल्या वाणीनं, लेखणीनं आणि वृत्तीनं हे श्रेय मिळवलेलं आहे. म्हणूनच त्यांना मिळालेल्या 'डी. लिट्' या सन्माननीय पदवीसाठी ते पात्रच आहेत, यात शंका नाही."
ज्येष्ठ साहित्यिक रणजित देसाई यांनी आबांचा गौरव करताना काढलेले उद्गार अत्यंत समर्पक होते,
"हा संपादक समाजसुधारणा आणि समाजधारणा या दोन्ही गोष्टींकडे जागरूकपणे पाहत होता आणि त्याचं समतोलत्व साधण्याचाही प्रयत्न करीत होता. अशावेळी देशात घडणार्या असंख्य आणि वैविध्यपूर्ण सामाजिक, राजकीय आणि जातीय घटनांकडे अर्थपूर्ण नजरेनं पाहून भावविवश न होता, अत्यंत समतोलपणे संपादकीय लिहिणं यातच संपादकाची खरी कसोटी असते. उद्रेकानं लिहिणं किंवा त्यावर भावविवश होऊन सनसनाटी भाष्य करणं या गोष्टी संपादकाला वर्ज्य असतात, हे 'पुढारी'कारांनी समतोलपणाचा अंगीकार करून सातत्यानं दाखवून दिलेलं आहे. म्हणूनच त्यांचा झालेला सन्मान ही समाजासाठी भूषणावह गोष्ट आहे."
या झाल्या दोन प्रातिनिधिक बलदंड प्रतिक्रिया; पण अशा असंख्य प्रतिक्रियांचा धुवाँधार कौतुकवर्षाव तेव्हा इतका झाला होता की, एवढं स्वतःचं कौतुक, एवढा सन्मान आणि एवढी कृतज्ञता आपल्याविषयी व्यक्त केली जाईल, याचा खरा तर आबांनाही अंदाज नव्हता. मृगाला आपल्या उदरातील कस्तुरीचा सुगंध कधीच कळत नाही, तो दुसर्यानंच सांगावं लागतं. तशी अवस्था आबांची झाली होती. वस्तुतः आबांना आपलं मोठेपण कधी समजलंच नव्हतं.
आबा मुळात मितभाषी. त्यातच प्रसिद्धीपराङमुख; पण माणूस बोलला नाही, तरी त्याचं कार्य बोलत असतं. मग तो प्रसिद्धीपासून दूर राहिला, तरी प्रसिद्धी त्याची पाठ सोडत नाही. त्याप्रमाणं आबांच्या कार्याची नोंद जनतेनंच घेतली होती. जशी ती सामान्य जनताजनार्दनानं घेतली होती, तशीच ती विद्वतजनांनीही घेतली होती आणि त्याचीच परिणती त्यांना 'डी. लिट्' ही विश्वविद्यालयाची सर्वोच्च उपाधी मिळण्यात झाली होती. अचानकपणे झालेल्या या सन्मानानं आणि जनतेच्या कौतुकानं आबाही भारावून गेले.
त्याला कारणही तसंच होतं. कारण, आबांचं आयुष्य एकमार्गी किंवा सरळ रेषेत जाणारं नव्हतं. त्यांच्या आयुष्याचा कार्डिओग्राम हा असंख्य चढउतारानं भरलेला होता. अर्थात, ज्याचा कार्डिओग्राफ सरळ रेषेत जातो, त्याच्या जगण्याला जिवंतपणा नसतोच. खर्या अर्थानं जीवन जगायचं असेल तर आयुष्याचा ई.सी.जी. हलताच हवा आणि तसा तो आबांचा होता. अगदी बालपणापासूनच त्यांच्या नशिबी कष्टाचं जीणंं आलं होतं. घरची आर्थिक परिस्थिती बेतासबातच होती. हुशार असूनही शिकण्याची उमेद आणि महत्त्वाकांक्षा असतानाही केवळ पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, म्हणून त्यांना शाळा सोडावी लागली. इयत्ता 7 वीत जो मुलगा बोर्डात पहिला आला होता, त्याला पुस्तकांअभावी शाळा सोडायला लागावी ही आपल्या देशाची शोकांतिकाच म्हटली पाहिजे!
परंतु, गणपतराव जाधव नावाच्या या माणसानं तेव्हाही परिस्थितीला दोष न देता प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढत उदरनिर्वाहाचा मार्ग शोधून काढला. स्वामी विवेकानंदांनीच एके ठिकाणी म्हटलं आहे, 'जे मुळातच मनुष्याच्या ठायी अमूर्तपणे असतं, त्याचं पूर्णत्वानं प्रकटीकरण करणे म्हणजे शिक्षण होय. म्हणूनच आपल्या आत स्थित असलेल्या ज्ञानाला प्रकट करण्याची ऊर्मी आणि त्यासाठीचे अथक प्रयत्न, आपल्यामध्ये किती तीव्र प्रमाणात आहेत, यावरच मनुष्याचं शिक्षित वा सुशिक्षित होणं अवलंबून असतं.'
स्वामी विवेकानंदांचं हे तत्त्वज्ञान आमच्या आबांना मात्र तंतोतंत लागू पडतं. आबा चार भिंतींच्या आत मिळणार्या ज्ञानाला पारखे झाले, तरी त्यांनी जीवनाच्या शाळेत मिळवलेले ज्ञान हे त्यांना आज 'डी. लिट्'पर्यंत घेऊन आलं. ही उंची मोजणं सहजसाध्य नव्हे. त्याच उंचीचा गौरव करण्याचं काम मात्र बुद्धिमंतांकडून, विद्वतसभेकडून मिळालेल्या या 'डी.लिट्'ने केलं.
तसं आबांचं बालपण गेलं ते गगनबावड्यात. त्या काळी गगनबावडा म्हणजे इतर गावांसारखंच एक खेडेगाव. डोंगराच्या कुशीत वसलेलं. नीट रस्ते नाहीत, आधुनिक सुविधांपासून कोसो दूर. शेती हाच उदरनिर्वाहाचा मुख्य व्यवसाय असला तरी स्वावलंबी गाव. आजूबाजूला दाट झाडी. एकंदरीतच गगनबावड्याला नैसर्गिक सौंदर्य अमाप लाभलेलं. खोल खोल दर्या-खोर्या… उंचच उंच डोंगर… गगनाला भिडलेलं गाव म्हणून त्याचं नाव गगनबावडा! अशा या निसर्गाशी झगडत, खस्ता खात वाटचाल करणार्या गगनबावडासारख्या गावात वास्तव्य करूनही आबा सातवीच्या परीक्षेला बोर्डात पहिले आले!
आबा खरेखुरे निसर्गपुत्रच. पुस्तकं वाचण्याबरोबरच त्यांच्याकडे निसर्ग वाचण्याचीही विलक्षण हातोटी. जणू निसर्ग त्यांचा जिवाभावाचा मित्रच होता! रानमळ्यात हुंदडावं, रानमेवा खावा आणि एखाद्या ओढ्यात पाय सोडून बालकवींच्या 'ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन; निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटांतून' यासारख्या कविता गुणगुणत निवांत बसावं, अशा स्वरूपाचं त्यांचं बालपण. बालकवींनी याच कवितेत शेवटी म्हटलं आहे,
'झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर,
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.'
जणू काही आबा स्वतःच बालकवींच्या कवितेतील 'औदुंबर' असत. परंतु; या औदुंबराला पाण्यात पाय सोडून बसण्याचं सुख फार काळ लाभलं नाही. त्यावेळी गगनबावड्यात सातवीनंतर शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी आबांना कोल्हापूरला यावं लागलं आणि निसर्गाशी जुळलेली त्यांची नाळ दुरावली.
कोल्हापूरला आल्यानंतर आबांनी इंग्रजी तीन इयत्ता केल्या. त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई हेही शिक्षण घेत होते. ते आबांचे वर्गमित्र. परंतु; बाळासाहेब देसाईंची ही शाळा सोबत आबांना फार काळ लाभली नाही. घरची परिस्थिती बेताची असल्याने आबांना नाईलाजास्तव शाळा सोडावी लागली, तरी जगाच्या उघड्या पुस्तकाचा अभ्यास मात्र त्यांनी मन लावून केला. ते ज्ञान समाजकारणासाठी उपयोगात आणले व त्याचाच गौरव शिवाजी विद्यापीठाकडून होत होता.
त्या काळी मुंबई प्रांतामध्ये भास्करराव जाधव हे मंत्री होते. त्यांना एका चांगल्या लेखनिकाची आवश्यकता होती. आबांचं वळणदार हस्ताक्षर आणि बावनकशी शुद्धलेखन पाहून भास्करराव फारच खूश झाले आणि ते आबांना आपल्याबरोबर मुंबईला घेऊन गेले. मुळात मुंबई ही एक अशी अजब नगरी आहे की, तिथं येणार्या माणसांसाठी ती त्याची आई होते. त्याची गुरू होते. त्याची शाळा होते. त्यासाठी विद्यार्थी मात्र तितकाच चाणाक्ष हवा.
मुंबईसारख्या जादूई नगरीत आबांनी प्रवेश केला आणि त्यांचं सारं आयुष्यच बदलून गेलं. भास्करराव जाधवांचा लेखनिक म्हणून काम करता करता त्यांनी वृत्तपत्रविद्येचा श्रीगणेशा कधी गिरवला, हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. अर्थात, आबांची वृत्तपत्र क्षेत्रातील कामगिरी, त्यांची महात्मा गांधींशी झालेली भेट, त्यांना लाभलेला आंबेडकरांचा सहवास, दिनकरराव जवळकर यांचं लाभलेलं मार्गदर्शन आणि त्यांच्यावर पडलेली साप्ताहिक 'कैवारी'ची जबाबदारी या सर्व गोष्टी यापूर्वीच मी आपणास सांगितलेल्या आहेत.
इच्छा असूनही परिस्थितीमुळे आबांना पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेता आलं नाही, तरी आबा स्वतःच एक मुक्त विद्यापीठ (जशिप णपर्ळींशीीळीूं) होते, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. भास्करराव जाधवांचे लेखनिक ते 'पुढारी'सारख्या अभिजात वृत्तपत्राचे संस्थापक संपादक ही त्यांची थक्क करणारी गरुडझेपच सर्वकाही सांगून जाते.
'कैवारी'सारख्या साप्ताहिकामध्ये उमेदवारी करीत असतानाच दिनकरराव जवळकर, भास्करराव जाधव, केशवराव जेधे, मामा वरेरकर, प्रबोधनकार ठाकरे हे सारे विद्वान, विचारवंत आणि समाजसुधारक जणू आबांचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणातील गुरुवर्यच होते! ब्राह्मणेतर चळवळीची सांगड स्वातंत्र्यासाठी लढणार्या राष्ट्रीय काँग्रेसशी घालून मराठा तरुण जातीयवादाकडे झुकू नये म्हणून त्याला स्वातंत्र्यलढ्यात ओढून आबांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला.
1930 च्या कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन क्रांतिकारकांना गुप्त संदेश पोहोचविण्याचं काम असो वा महात्मा गांधींची भेट घेऊन त्यांचा संदेश बहुजनांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी असो, आबांनी ही कामं मोठ्या निष्ठेनं करून दाखविली. इतकेच नव्हे, तर मुंबईतील सामाजिक आणि कामगार चळवळीतील त्यांचा सहभाग आणि सत्यशोधक चळवळीतील त्यांची अंधश्रद्धेविरुद्धची लढाई, या गोष्टी त्यांच्यातील पुरोगामित्वाची साक्ष देणार्या होत्या.
इतकंच काय, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांचं मुंबईच्या दलित वस्तीतील वास्तव्य किंवा नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहातील त्यांचा सहभाग, हे त्यांच्या सर्वधर्मसमभाव या विचारसरणीचा अवलंब करणार्या मनोवृत्तीचा दाखलाच होता. आबांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अशा प्रकारचे असंख्य पदर लपलेले आपल्याला दिसून येतील. एक घडी उघडून बघावी, तर दुसरी त्या खाली लपलेली आहेच. किती घड्या उलघडणार आणि किती म्हणून सांगणार?
अनुभवाच्या विद्यापीठातील उत्तम शिक्षणाची शिदोरी पाठीशी बांधूनच आबा कोल्हापूरला परत आले. अर्थात, आबांचा हा असा सागराकडून नदीकडे उलटा प्रवास का झाला; याला कारणही तसंच घडलं. पहिलं कारण, तशी नियतीचीच इच्छा होती म्हणून. कारण, जर आबा कोल्हापुरात आले नसते, तर 'पुढारी' जन्माला आला नसता! आणि दुसरं कारण जे थोडं भौतिक आहे, ते –
स्वातंत्र्य संग्रामात दिनकरराव जवळकरांना अटक झाली. ब्रिटिशांच्या दडपशाहीचा रेटाही वाढला होता. जवळकर तुरुंगात गेल्यानंतर 'कैवारी'ची शक्य तितकी जबाबदारी आबांनी पेलली. परंतु; ते बंद करावे लागले. पुढे दिनकरराव जवळकर इंग्लंडला गेले. तेथून ते परतल्यानंतर त्यांनी 'तेज' साप्ताहिक सुरू करून त्याची जबाबदारीही आबांवरच टाकली. दरम्यान, जवळकरांना दारूचे व्यसन लागले होते. त्यातून ते सावरलेच नाहीत. ते आजारी पडले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. जवळकर गेल्याने आबांना एकाकीपण येत असल्याचे जाणवल्यामुळे त्यांनी कोल्हापूर जवळ केले.
आबांच्या पत्रकारितेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या सहवासाचा परिमळ आयुष्यभर दरवळत राहिला. आबांची वाटचाल खडतर असली, तरी ते कधीही थांबले नाहीत. छोट्या-मोठ्या संकटांवर मात करून ते पुढे चालतच राहिले. आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, हा विचार त्यांचं मन व्यापून राहिला होता. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी सुरू केलेला 'पुढारी' आणि त्याद्वारे जनतेच्या प्रश्नांना फोडलेली वाचा, मांडलेले प्रश्न हे त्यांच्यातील विजिगीषु मनोवृत्तीची साक्ष देतात. जनतेचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून त्यांनी आपल्या लेखणीला सदैव धार चढवून ठेवलेली. आबांचा स्वभाव अबोल… या कवचकुंडलाला मात्र त्यापासून कुठली क्षती पोहोचली नाही. सगळ्यात आहे; पण सगळ्यात असूनही नाही अशी अनासक्त वृत्ती त्यांनी आयुष्यभर जोपासली. रणजित देसाई तर त्यांच्याबद्दल बोलताना म्हणायचे, 'दक्षिण महाराष्ट्रातील पत्रसृष्टीत 'पुढारी'कार हे अखेरचे कणखर नेमस्त ठरतील,' ते उगाच नव्हे.
केवळ पत्रकारितेतीलच नव्हे तर आबांचं समाजकारणातीलही उत्तुंग काम लक्षात घेऊनच शिवाजी विद्यापीठानं त्यांना 'डी. लिट्' ही
सर्वोच्च पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतलेला होता. आबांनी आपल्या प्रचंड कामाचा जो कळस गाठला होता, त्या कळसावर झेंडा लावण्याचं काम विद्यापीठानं केलं होतं, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण, 'डी. लिट्' प्रदान करताना देण्यात आलेल्या गौरवपत्रात विद्यापीठानं नेमकं हेच अधोरेखित केलं होतं.
आबांच्या कार्याचा संपूर्ण जीवनपट मांडतानाच त्या गौरवपत्रात नमूद केलं होतं की, 'ग. गो. जाधव यांनी प्रसिद्धीपासून पूर्णपणे अलिप्त राहून 'पुढारी'च्या माध्यमातून उपेक्षित, दलित, श्रमिक, शेतकरी यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न अविश्रांतपणे, निर्भयपणे हाताळले आहेत.'
एखाद्या विद्यापीठानं पत्रकाराला डॉक्टरेट देऊन गौरव करण्याचा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील हा पहिलाच प्रसंग होता. या घटनेमागील आणखी एक विशेष म्हणजे प्रसिद्ध इतिहासकार डॉ. बाळकृष्ण यांनी शिवाजी विद्यापीठाची संकल्पना प्रथम मांडली, तीच मुळी छत्रपती राजाराम महाराज व आबांच्या सूचनेनुसार. अन् आबांनीच सुरू केलेल्या 'सेवक' या साप्ताहिकाच्या पहिल्याच अंकामध्ये त्यांचा लेख छापला गेला! आणि आता तेच विद्यापीठ आबांना डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान करीत होतं. हा फक्त राज्यातीलच नव्हे, तर संपूर्ण देशातील वृत्तपत्र सृष्टीचा गौरव होता.
महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी आबा मुंबई कौन्सिल असेम्ब्लीमध्ये आमदार होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम आदी आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभागही होता. राज्याच्या विशाल राजकारणाचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. अगदी बाळासाहेब खेर, यशवंतराव चव्हाणांपासून त्यांनी राजकारणाचे पट पाहिलेले. अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या निर्मितीत, शिक्षण संस्था सुरू करण्यात तसेच कोयना आणि काळम्मावाडीसारखी धरणं बांधण्याच्या महत्त्वपूर्ण बाबीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना, शिवाजी विद्यापीठाच्या उभारणीत मोलाचे सहकार्य, शेतकरी संघाचेही संस्थापक सदस्य अशा कितीतरी बिरुदावल्या त्यांच्या नावावर होत्या. अखंड हिंदुस्थानमध्ये सामील होण्याबाबत चाललेल्या कोल्हापूरच्या प्रजा परिषद चळवळीमध्येही त्यांचे मोठे योगदान होते. भांडवलशाही वृत्तपत्रांना टक्कर देत त्यांनी 'पुढारी'च्या साम्राज्याचा पाया घालून ते वाढवलंही होतं.
'डी. लिट्'सारखा मोठा सन्मान जाहीर होऊनही आबा मात्र स्थितप्रज्ञासारखे शांत आणि निवांत होते. इतकंच काय, पण पदवीदान समारंभाला उपस्थित राहायलाही ते राजी नव्हते. नरूभाऊ लिमयेंनी त्यांचं केलेलं वर्णन म्हणजे, 'गणपतराव खरे सत्यशोधक. अत्यंत साधी राहणी, प्रेमळ, निगर्वी स्वभाव, केल्या कामाचा अहंकार नाही, तर झाले काम ती समाजसेवा होती आणि आपल्या वृत्तपत्रामार्फत समाजाला स्वाभिमानी जीणे जगायला शिकवता आले हेच आपले श्रेय मानणारे ते पत्रकार.' नरूभाऊंच्या या मतांचा मी मुलगा असूनही तंतोतंत अनुभव घेत होतो. अर्थात, वाढलेले वय हे आबांचं समारंभाला न येण्यामागचं कारण होतंच; पण माझ्या मनाला ते पटत नव्हतं. ज्या विद्यापीठाच्या मागणीचा विचार प्रथम आपणाकडेच प्रसवतो व आपणच सुरू केलेल्या साप्ताहिकातून तो प्रथमतः पुढे येतो, तेच विद्यापीठ आपला डॉक्टरेट देऊन गौरव करतं, ही बाब निश्चितच महत्त्वाची नि मानाची होती आणि माझ्या दृष्टीनं आपल्या पित्याचा होत असलेला गौरव पाहण्यातही एक वेगळीच खुमारी होती.
अखेर महत्प्रयासानं मी त्यांना कसंबसं तयार केलं. समारंभासाठी त्यांना नवीन कोट शिवण्याची माझी फार इच्छा होती. मी तसा हट्टही धरला; पण आबांनी ते मानलं नाही. त्यांनी नेहमीच्या साध्या पोशाखातच कार्यक्रमाला जायचं ठरवलं. मग माझाही नाईलाज झाला. आबा सहसा केसांचा भांग पाडत नसत. फक्त हातानं केस मागं फिरवीत. परंतु; त्या दिवशी मात्र मी हातात कंगवा घेऊन त्यांचे केस व्यवस्थित केले. त्यावर ते कौतुकानं उद्गारले,
"आता तूच माझा बाप झालास!"
त्यांच्या या उद्गारावर आम्ही सर्व कुटुंबीय हास्यकल्लोळात बुडालो!
11 फेब्रुवारी, 1986 रोजी शिवाजी विद्यापीठाच्या भव्य प्रांगणात हा शानदार कार्यक्रम पार पडला. पदवीप्राप्त स्नातकांच्या मिरवणुकीत काही काळ सहभागी होऊन आबा व्यासपीठावर विराजमान झाले.
तत्कालीन केंद्रीय मंत्री पी. व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते आणि राज्यपाल कोना प्रभाकरराव यांच्या अध्यक्षतेखाली आबांना सन्माननीय डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. यावेळी कुलगुरू भोगीशयन उपस्थित होते. पदवी प्रदान केल्यानंतर आबांनी आभार प्रदर्शन करताना मांडलेले विचार आजही मराठी मुलुखातील भल्या भल्या राजकारणी, विचारवंतांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहेत.
आपल्या भाषणात आबा म्हणाले होते, "मराठी आपली मायबोली आहे. मराठीची उपेक्षा म्हणजे मातेची उपेक्षा होय आणि जो मातेची उपेक्षा करतो, त्याच्यासारखा कृतघ्न दुसरा कोणी नाही! म्हणून महाराष्ट्रातील कोणत्याही विद्यापीठामध्ये मराठीची उपेक्षा होता कामा नये. प्रत्येक मुलाला मातृभाषेतून शिकण्याचा मूलभूत अधिकार आहे. कारण, मातृभाषा हेच शिक्षणाचं नैसर्गिक आणि प्रभावी माध्यम आहे. म्हणून सर्व स्तरांवरील अभ्यासक्रमामध्ये मराठीला अग्रक्रम मिळालाच पाहिजे! आणि तो अग्रक्रम अनिवार्य असायला हवा!
आज महाराष्ट्र देशी मराठीची अवस्था काय झाली आहे, ते पाहिल्यानंतर सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी आबांनी मांडलेले विचार किती बोलके होते, याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. इंग्रजी, हिंदी, गुजरातीसारख्या इतर भाषांच्या आक्रमणामुळे मराठी भाषेला आज कशी एखाद्या बोहारणीची अवस्था प्राप्त झालेली आहे, ते आपण बघतोच आहोत. आबांना मराठी भाषेबद्दल चिंता वाटत होती. तिच्यावर कोसळू पाहत असलेल्या संकटांची चाहूल त्यांना आधीच लागली होती. त्यातून त्यांचं द्रष्टेपणच सिद्ध होत होतं."
आबा आपल्या तत्त्वांशी, पत्करलेल्या पेशाशी नेहमीच प्रामाणिक राहिले. म्हणूनच तत्त्वनिष्ठेबद्दल बोलण्याचा त्यांना अधिकार होता. त्या अधिकाराच्या भावनेतूनच त्यांनी आपल्या पत्रकार बंधूंना चार गोष्टी सांगितल्या.
"काही झालं तरी पत्रकारांनी जनप्रबोधन, जनशिक्षण, जनहित, जनकल्याण आणि जनविकास करण्याची आपली व्रतस्थ वृत्ती सोडता कामा नये. निरक्षरता निर्मूलन असू दे किंवा सार्वत्रिक शिक्षण प्रसार असू दे, त्यामध्ये पत्रकारांनी योजनापूर्वक झटून हातभार लावला पाहिजे. देशात खर्या अर्थाने लोकशाही जीवननिष्ठा निर्माण करून निर्भय आणि निकोप लोकशाही रूजविण्याचं महत्त्वाचं काम आम्हा पत्रकारांचंच आहे आणि आपण ते प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे."
"लक्षात ठेवा! जो वाचक तुम्ही छापलेल्या बातमीवर विश्वास ठेवतो, तो तुमच्या निकोप आणि निर्भीड विचारांवर का नाही विश्वास ठेवणार? परंतु; त्यासाठी आपणही निष्पक्षपणे विचार मांडण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विरोधी पक्षांचे विधायक कार्यही डोळ्यांत तेल घालून जागरूकतेनं वाचकांपर्यंत पोहोचविण्याचं कामही आपलंच आहे. निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी हेही आवश्यक आहे."
"सुराज्य, कल्याणकारी राज्य तसेच जातपातविरहित असा वर्गहीन आणि समानतेवर आधारलेला चारित्र्यसंपन्न, एकसंध समाज निर्माण करण्यासाठी आपण पत्रकारांनी कंबर कसली पाहिजे! "
आबांचे हे विचार केवळ कर्तव्याची जाणीव करून देणारेच नव्हते, तर त्यामध्ये उद्याच्या भारताचे प्रतिबिंबही पडले होते आणि आज पदोपदी त्यांच्या विचारांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
आबांना 'डी. लिट्' देणार्या शिवाजी विद्यापीठाचा गौरव करताना नरूभाऊ लिमये म्हणाले होते, 'शिवाजी विद्यापीठ आपल्या शहरातल्या एका केवळ प्राथमिक शिक्षण पूर्ण केेलेल्या अशा विद्वानाला 'डी. लिट्' पदवी देऊन तो परीक्षार्थी विद्वानापेक्षा खरा शिक्षित, ज्ञानी, सुजाण आहे हे सिद्ध करीत आहे. याबद्दल श्री. गणपतराव जाधव, संपादक दै. 'पुढारी' यांच्याबरोबरच विद्यापीठाचे अभिनंदन केले पाहिजे. खरे म्हणजे या पदवीचे योग्य ठिकाणी प्रदान केले तर विद्यापीठच गौरवास पात्र होते आणि तीच अपेक्षा असते.' यापेक्षा गौरव तो अधिक काय असू शकतो!
पत्रकाराला नेहमी अनिष्ट घटना नोंदवाव्या लागतात. त्यावर परखड लिहावे लागते. त्यामुळे पत्रकाराला 'वरून' मित्र अन् आतून 'शत्रू' अशा मंडळींत आपले काम करावे लागते, याचा अनुभव नेहमीच येतो. आबांचीही त्यापासून सुटका झाली नव्हती. तरीही आबांनी आपला व्यवसाय व व्यक्तिगत संबंध यामधील लक्ष्मण रेषा पाळली. आबांची वाटचाल फक्त पत्रकारितेतील मापदंड सांभाळूनच चालली नव्हती, तर समाजाच्या सर्व अंगांशी ते भिडले होते. समाजाचे प्रश्न ते स्वतःचे समजून चालले होते. आबांचे वि. स. खांडेकरांपासून तत्कालीन जवळपास सर्व साहित्यिकांशी मधुर संबंध होते. पत्रकार आणि साहित्यिक यामधील भेद मांडताना ते एकदा रणजित देसाईंना म्हणाले होते, 'रणजित, आम्ही बोलूनचालून पत्रकार. आज मी लिहिलं. उद्या वाचक विसरून जातो; पण तुमची भूमिका आमच्यापेक्षा ज्येष्ठ पत्रकाराची आहे. समाजात संस्कार वाढावेत, ते कायम टिकावेत हे सामर्थ्य तुमचे आहे. जे लिहाल, ते त्या संस्काराला जपून लिहा.'
आबांचे हे शब्दामृत ऐकताना रणजित देसाईंच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं. ती हृद आठवण त्यांनी कायमपणे जपली होती व संधी मिळेल तेव्हा त्यावर ते लिहायचे व जाहीरपणेही सांगायचे. समोरच्याचा हळुवारपणा जपत आबा नेमकेपणाने वर्मावरच बोट ठेवत असत. हळुवारपणे आपलं इप्सित साध्य करताना ते समोरच्याच्या भावनांना दुखवायचे नाहीत. रणजित देसाईंना आबांच्या व्यक्तिमत्त्वातला दिलदारपणा भावला होता. आबांच्या देदीप्यमान कारकिर्दीविषयी रणजित देसाईंनीच लिहिलं होतं, 'संपादकांजवळ एक विधायक, रचनात्मक दृष्टिकोन आहे. त्याचा आविष्कार करताना त्यांनी कसलाही आपपरभाव स्वीकारलेला नाही. संघर्ष तिथे विधायक विरोध आणि स्वीकार तेथे रचनात्मक प्रवृत्ती अशी मुळी संपादक जाधव यांची मूलभूत दृष्टीच आहे…' आबांना शिवाजी विद्यापीठाने 'डी. लिट्' दिली तरी समाजातील विद्वतजनांकडून आबांचा असाही गौरव होतच होता.
आबांना 'डी. लिट्' मिळाल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रमुख वृत्तपत्रांत आबांच्या कार्याचा गौरव करणारे लेख प्रसिद्ध झाले. रणजित देसाई, नरूभाऊ लिमये यांसारख्या मान्यवरांच्या लेखांनी आबांची महती महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांत पोहोचली. आबांच्या सामाजिक दृष्टीबाबत 'मृत्युंजय'कार शिवाजी सावंत म्हणाले होते, 'गेल्या दशकातील कोल्हापूरचा परिसर धरून पश्चिम महाराष्ट्राची जी वैचारिक, सामाजिक व शैक्षणिक अशी घसघशीत प्रगती झाली आहे तिच्या श्रेयनामावलीत 'ग. गों.'चे नाव निःसंशय अग्रक्रमाने आहे. पश्चिम महाराष्ट्राला दैनिकाकडे व 'वृत्त' या विषयाकडे बघण्याची जाणती दृष्टी 'ग. गो.'नी दिली.'
साहजिकच आबांच्या 'डी. लिट्' गौरवानं माझा ऊर अभिमानानं भरून आला.
अन् – आता आमचे आबा, 'पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव' झाले होते!