सिंहायन आत्मचरित्र : इंदिराजींची हत्या

सिंहायन आत्मचरित्र : इंदिराजींची हत्या
सिंहायन आत्मचरित्र : इंदिराजींची हत्या
Published on
Updated on

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव, (मुख्य संपादक, दैनिक पुढारी)

गतवर्षी पाच नोव्हेंबर 2020 रोजी 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. 'पुढारी' हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे 'बहार'मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
संपादक, बहार पुरवणी

"मी आज इथं आहे; पण कदाचित उद्या मी या जगात नसेनही! परंतु, मला त्याची पर्वा नाही! माझं आयुष्य मी समृद्धपणे जगलेली आहे. मरतानाही मला एकाच गोष्टीचं समाधान वाटेल की, मी माझं आयुष्य राष्ट्राच्या सेवेत व्यतीत केलं आहे! मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करीत राहीन आणि मी जेव्हा मरेन, तेव्हा माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब आणि थेंब भारताला बळकट करण्यासाठीच खर्ची पडेल!"
30 ऑक्टोबर, 1984.
स्थळ : भुवनेश्वर, ओडिसा.

इंदिरा गांधी यांचं अखेरचं भाषण! कधी नव्हे, एवढ्या इंदिराजी आज भावुक झाल्या होत्या! त्यांच्या त्या हृदयस्पर्शी भाषणानं हजारो श्रोत्यांच्या काळजाला हात घातला होता आणि नियती नावाची पाल कुठेतरी चुकचुकली होती! त्यांच्या या भाषणानं ओडिसाचे राज्यपाल विश्वंभरनाथ पांडेही सद्गदित झाले होते.

त्या रात्री इंदिराजी रात्रभर जाग्याच होत्या. अस्थमाचा त्रास होऊ लागला म्हणून सोनियाजी औषध शोधण्यासाठी आपल्या शय्यागृहाच्या बाहेर आल्या, तर इंदिराजींच्या खोलीतील लाईट चालूच असल्याचं त्यांना दिसलं. पहाटेचे चार वाजले होते! इंदिराजी इतक्या दक्ष होत्या की, त्यांना लगेचच सोनियांची चाहूल लागली आणि त्या दार उघडून बाहेर आल्या.
"सोनिया! काही हवंय का?" त्यांनी विचारलं.
"माझं औषध शोधतेय!" सोनिया म्हणाल्या.
मग इंदिराजींनी सोनियाजींना औषध शोधायला मदत केली आणि ते शोधून दिल्यावर त्या म्हणाल्या,
"जादा त्रास होतोय असं वाटलं, तर मला हाक मार! मी जागीच आहे!"
इंदिराजींनी खोलीचं दार लावून घेतलं आणि त्या खिडकीपाशी जाऊन क्षणभर उभ्या राहिल्या. बाहेर अंधार होता. त्यांच्या विश्वासावर देश शांतपणे झोपी गेला होता!
31 ऑक्टोबर, 1984.
देशाच्या इतिहासातील तो काळाकुट्ट दिवस उगवला!
एक, सफदरजंग रोड हे पंतप्रधानांचं निवासस्थान. त्याच्या शेजारीच असलेला एक, अकबर रोड हा बंगलाही त्याला जोडलेला. त्या बंगल्यातच पंतप्रधानांचं कार्यालय. पंतप्रधानांची बी.बी.सी.साठी मुलाखत ठरलेली असते. त्यांची पहिली मिटिंग पीटर उस्तिनॉव्ह यांच्याबरोबरच असते. ते इंदिराजींवर डॉक्युमेंट्री बनवणार असतात.

घड्याळात 9 वा. 10 मिनिटं होतात आणि प्रसन्नमुख प्रियदर्शिनी इंदिराजी बंगल्यातून बाहेर पडतात. त्या झपझप चालत निवासस्थानातून कार्यालयाच्या बंगल्याकडे चालू लागतात. त्यांच्या चालण्याचा वेग एखाद्या तरुणीलाही लाजवणारा असतो.

इंदिराजी आपल्या कार्यालयाकडे वळल्या असतील नसतील तोच बियंत सिंग नावाचा उपनिरीक्षक समोर येऊन कडक सलाम ठोकतो. इंदिराजी हसून त्याचं अभिवादन स्वीकारतात. काळ क्षणभर जागीच थांबतो. इंदिराजीही एकाएकी थबकतात! कारण –
बियंत सिंगच्या हातात पिस्तूल असतं! काही कळायच्या आतच डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच बियंत सिंगच्या पिस्तुलातून गोळी सुटते आणि ती इंदिराजींचा वेध घेते. अचानक झालेल्या हल्ल्यानं गडबडलेल्या इंदिराजी एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून आपला चेहरा हातांनी लपवून घेतात! बियंत सिंग त्याचं पिस्तूल खाली होईपर्यंत गोळ्या झाडतच राहतो. मग तो सतवंत सिंगला इशारा करतो!

"देखता क्या है? गोली मारो!" बियंत सिंग त्याच्यावर ओरडतो.
आणि मग खाडकन भानावर आलेला सतवंत सिंग हातातल्या मशिनगनमधून इंदिराजींवर पंचवीस गोळ्या झाडतो! देहाची चाळण झालेल्या इंदिराजी खाली कोसळतात. जेव्हा सर्वांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांना कळून चुकतं, की –
रवींद्रनाथांची प्रियदर्शिनी, चाचा नेहरूंची प्रियदर्शिनी आणि भारताची आयर्न लेडी आज धारातीर्थी पडलेली आहे.

दुसर्‍याच क्षणी इंडो तिबेट तुकडीतील सुरक्षारक्षक धावत येतात. ते मारेकर्‍यांवर गोळीबार करतात. त्यात सतवंत सिंग जखमी होतो, तर बियंत सिंग ठार होतो. एक भीषण नाट्य संपलेलं असतं!

"मम्मीऽऽ!"

गोळीबाराचा आवाज ऐकून अनवाणी पायांनीच सोनियाजी बाहेर धावत आल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या इंदिराजींकडे त्यांची नजर गेली आणि त्यांनी गगनभेदी किंकाळी फोडली! दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, त्या क्षणी देशाच्या पंतप्रधानांच्या बंगल्यावर डॉक्टर नव्हता की, एखादी रुग्णवाहिका नव्हती.

अखेर इंदिराजी वापरीत असलेल्या अ‍ॅम्बॅसिडरमध्येच इंदिराजींना उचलून ठेवण्यात आलं. सोनियांनी त्यांचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं आणि 'ऑल इंडिया मेडिकल सायन्स' या हॉस्पिटलच्या दिशेनं गाडी भरधाव सोडण्यात आली!

साडेनऊ वाजता इंदिराजींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. एक न्यूरोसर्जन, चार सर्जन आणि इंदिराजींचे वैयक्तिक डॉक्टर के. पी. ठाकूर यांनी शस्त्रक्रिया केली. साडेतीन तास शर्थीचे प्रयत्न करून त्यांच्या शरीरातून सात गोळ्या बाहेर काढण्यात आल्या; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दुपारी अडीच वाजता या थोर, अलौकिक व्यक्तिमत्त्वानं या देशाचा आणि जगाचाच निरोप घेतला! एका झुंजार पर्वाचा अस्त झाला!

त्या दिवशी दुपारी मी 'पुढारी' कार्यालयातच होतो. अचानक 'टेलिप्रिंटर'चा खडखडाट कानावर पडला. पीटीआय, यूएनआय, समाचार भारती सार्‍याच वृत्तसंस्थांचे टेलिप्रिंटर्स खणखणू लागले आणि बातमी टाईप होऊ लागली.

'I-n-d-i-r-a G-a-n-d-h-i s-h-o-t t-o d-e-a-t-h'

आणि मी सुन्न झालो! अनपेक्षित आलेल्या या दुर्दैवी बातमीनं मन बधिर झालं! क्षणभर वाटलं की, ही बातमी खोटी ठरली, तर किती बरं होईल? पण –

माझ्या टेबलावरचा टेलिफोन खणखणू लागला. लाईटनिंग कॉलची रिंगटोन ऐकून मनात चर्रर्रर्र झालं. कॉल दिल्लीच्या प्रतिनिधीचाच होता. बातमीला दुजोरा मिळाला!

ज्येष्ठ पत्रकार या नात्यानं पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं नाव सदोदित समोर; पण त्यांच्या धक्कादायक मृत्यूची बातमी अशी तडकाफडकी देण्याची वेळ येईल, असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं! परंतु, पत्रकाराला आपलं काम करावंच लागतं. आम्ही तत्काळ दै. 'पुढारी'चा जादा अंक काढला. पहिल्याच पानावर 'इंदिराजी अमर आहेत' हा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला.

इंदिराजींची आणि माझी दिल्लीत तीन-चारवेळा भेट झाली होती. 'पुढारी'चे दिल्लीतील प्रतिनिधी दत्ता कुलकर्णी यांच्या माध्यमातून या भेटी झाल्या होत्या. इंदिराजींचा स्वभाव कमालीचा धाडसी. त्यांच्यातील निर्भयता त्यांच्या चेहर्‍यावरूनच प्रतीत होत असे. त्यांचे पिताजी पंडित जवाहरलाल नेहरू जे निर्णय घेऊ शकले नव्हते, ते घेण्याचं धाडस या रणरागिणीनं दाखवलं. बँकांचं राष्ट्रीयीकरण, बांगला देशाची निर्मिती आणि ब्ल्यू स्टार ऑपरेशन यासारखे धडाडीचे निर्णय घेऊन त्यांनी जनमानसात आपला ठसा उमटवला. देशात महिलांना सन्मान मिळवून देण्यात त्या अग्रेसर होत्या.

sinhayan@pudhari.co.in

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news