सावित्रीबाई जोतिराव फुले : स्त्रीमुक्‍तीच्या आद्य प्रवर्तक

सावित्रीबाई जोतिराव फुले : स्त्रीमुक्‍तीच्या आद्य प्रवर्तक
Published on
Updated on

क्रांतिज्योती, आद्य शिक्षिका, समाजसेविका सावित्रीबाई जोतिराव फुले यांची आज जयंती. त्यानिमित्त…

भारताच्या प्रथम महिला शिक्षिका ही एवढीच ओळख सावित्रीबाई फुलेंच्या कर्तृत्वाची करून देण्यासाठी पुरेशी नाही, तर उत्तम कवयित्री, आध्यापिका, समाजसेविका त्याबरोबर देशातील पहिली विद्याग्रहण करणारी स्त्री आणि भारतीय स्त्रीमुक्‍तीच्या आद्य प्रवर्तक, महिलांच्या मुक्‍तीदाता अशी त्यांची ओळख सांगणे श्रेयस्कर ठरेल.

सावित्रीबाईंचा जन्म 2 जानेवारी 1837 मध्ये नायगाव येथे झाला. वयाच्या 9 व्या वर्षी जोतिराव फुलेंशी त्यांचा विवाह झाला, तेव्हा त्या शिक्षित नव्हत्या. जोतिरावांनी तत्कालीन समाजाचा विरोध झुगारून सावित्रीबाईंना शिकवले. भारतीय स्त्रियांना ज्ञानाच्या नव्या युगात आणण्याची सुरुवात फुले दाम्पत्याने केली. खरे तर, जोतिराव फुलेंच्या सामाजिक कार्यातून सावित्रीबाईंना वेगळे करता येत नाही. सावित्रीबाई स्वतः शिकल्या.

1848 मध्ये पुण्यात देशातील पहिली शाळा त्यांनी स्थापन केली आणि त्या शाळेत सावित्रीबाई शिक्षिका म्हणून त्यांनी पहिले पाऊल मोठ्या धाडसाने टाकले. स्त्री शिक्षण क्षेत्रात भारतीय स्त्रीने टाकलेले ते पहिले पाऊल होते. शाळेत सहा मुली या देशातील पहिल्या ज्ञानाईची मोठ्या आतुरतेने वाट पाहायच्या. तत्कालीन कर्मठ धर्ममार्तंडांनी त्यांच्या शिक्षणकार्यात अनेक प्रकारे अडथळे आणले. शिव्या दिल्या, दगडफेक केली, अंगावर शेण फेकले.

19 व्या शतकात लहान वयातच लग्‍ने होत होती. तरुण वयातच अनेक स्त्रिया विधवा व्हायच्या. त्यांना पुन्हा विवाह करता येत नव्हता. विधवांचे केशवपण करण्याची वाईट प्रथा होती. त्यावर फुले दाम्पत्याने प्रबोधनाचे शस्त्र केले. नाभिकांचा संप घडवून आणला. अनेक तरुण विधवा घरातीलच पुरुषांच्या अत्याचाराला बळी पडत होत्या.

त्यातून मूल जन्माला येण्याच्या भीतीने या महिला आत्महत्या करायच्या. त्यासाठी फुले दाम्पत्याने महिलांच्या संरक्षणासाठी 'बाल त्याग प्रतिबंध गृह' सुरू केले. फसवणुकीतून गर्भवती राहिलेल्या महिला आणि त्यांच्या नवजात अर्भकांसाठी हे केंद्र मोठा आधार होता. ज्योतिरावांनी अशाच एका महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले. सावित्रीबाईंनी त्या बाईची सेवा केली. फुले दाम्पत्याने या महिलेच्या मुलाला स्वतःचे नाव दिले. त्या मुलाचे नाव यशवंत. ते पुढे डॉक्टर झाले.

सावित्रीबाई उत्तम लेखिकाही होत्या. 'काव्यफुले', 'बावनकशी सुबोध रत्नाकरे', 'सावित्रीबाईंची गाणी' अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. ज्योतिरावांचे महानिर्वाण झाल्यानंतर सावित्रीबाईंनी न डगमगता सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे चालू ठेवले. 1848 ते 1897 अशी सलग 50 वर्षे त्या लोकांसाठी राबत होत्या. प्लेगच्या साथीने थैमान घातले तेव्हा जीव धोक्यात घालून त्यांनी रुग्णांची सुश्रुषा केली. अशाच एका प्लेगग्रस्त मुलाचा जीव वाचविण्यासाठी त्याला पाठीवर घेऊन त्या दवाखान्यात पोहोचल्या. यामध्ये सावित्रीबाईंनाही प्लेगची लागण झाली व पुढे 10 मार्च 1897 मध्ये त्यातच त्यांचे निधन झाले.

सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समानता, जातीनिर्मूलन, संवाद, वादविवाद, ज्ञानप्रसार, संसाधनांचेेफेरवाटप, चिकित्सा आणि विद्रोह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे त्यांनी समाजप्रबोधन केले. आधुनिक भारतात स्त्री-पुरुष समतेचा पाया घालण्याचे कार्य त्यांनी केले. आज स्त्रियांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात भरारी घेतलेली आहे. त्यांना ऊर्जा देण्याचे कार्य सावित्रीबाईंच्या जीवनकार्यातून होत असते. त्यांनी श्रमाचे आणि तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून देणारे कृतिशील शिक्षण देण्यावर भर दिला.

शिक्षणातला गळतीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ठोस उपाय योजले व ते अंमलात आणले. सावित्रीबाईंच्या या क्रांतीचा गौरव करताना चरित्रकार धनंजय कीर म्हणतात, '19 व्या शतकात स्त्रियांच्या उद्धारासाठी जीवन व्यतीत केलेले सावित्रीबाईंसारखे अन्य आदर्श, उदात्त उदाहरण क्‍वचितच आढळून येईल.' भारतीय महिलांच्या जीवनात शिक्षणातून क्रांती करणार्‍या क्रांतिज्योती सावित्रीबाई भारतीय स्त्रीमुक्‍तीच्या आद्य प्रवर्तक ठरल्या.

– नम्रता ढाळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news