

देशातून कोरोना अद्याप गेलेला नाही. केंद्र शासनाने सणासुदीनंतर कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचा गंभीर इशारा देऊनही नागरिक सैल झाले आहेत. कोल्हापुरातही नवरात्रौत्सवाच्या उसळलेल्या गर्दीमध्ये नागरिकांच्या तोंडावरचा मास्क खाली घसरला आहे. यावर तातडीने दक्षता घेतली नाही, तर उंबर्याबाहेर निघालेला कोरोना पुन्हा एकदा आपले कारनामे दाखविण्याचा धोका आहे.
कोल्हापुरात सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लोंढे वाहताना दिसताहेत. श्री अंबाबाई मंदिर परिसरात चहुबाजूने वाहतुकीची कोंडी निर्माण होत असताना, नागरिकही दर्शनाच्या निमित्ताने बाहेर पडले आहेत. परगावाहून येणार्या नागरिकांची संख्याही वाढत आहे आणि बाजारपेठांमध्ये पुन्हा एकदा गर्दीचे वातावरण दिसते आहे. ही स्थिती साथरोगांचा संसर्ग फैलावण्यास पोषक असते. विशेषतः, कोरोनाच्या द़ृष्टीने ती अधिक गंभीर आहे.
या पार्श्वभूमीवर तोंडावरील मास्क आणि सुरक्षित अंतर कायम ठेवणे गरजेचे असताना, अर्ध्याहून अधिक नागरिकांचे मास्क हनुवटीच्या खाली आल्याचे चित्र दिसते आहे, तर उर्वरितांमध्ये बहुतांशांनी कोरोना गेल्याचा समज करून मास्कला सोडचिठ्ठी दिल्याचे निदर्शनास येत आहे. ही परिस्थिती कोरोनाच्या दोन लाटेमध्ये पोळलेल्या कोल्हापूरसाठी चिंताजनक आहे. त्यावर प्रशासनाकडून कडक निर्बंधांची अपेक्षा जशी आहे, तसे नागरिकांनी स्वतःहून सुरक्षिततेचे नियम पाळण्यासाठी पुढे आले पाहिजे; अन्यथा पुन्हा एकदा कोल्हापूर अडचणीत सापडू शकते.
संपूर्ण जगभरात दैनंदिन साडेचार लाख रुग्ण नव्याने बाधित होत आहेत. या स्थितीचा आढावा घेऊनच केंद्र शासनाने सर्वत्र सतर्कतेचे आदेश दिले होते. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ. गुलेरिया यांच्या मते, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हा भारतातील कोरोनाच्या द़ृष्टीने संक्रमण काळ आहे. यामुळेच सणासुदीच्या काळामध्ये कोरोनाच्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारची ढिलाई झाल्यास देशाला पुन्हा एकदा तिसर्या लाटेला सामोरे जावे लागेल.