

वॉशिंग्टन : एका मागोमाग एक लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येत असून त्यापैकी काही लघुग्रह आपल्या पृथ्वीसाठी धोकादायक असू शकतात. अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'ने अशाच एका लघुग्रहाबाबत अलर्ट जारी केला आहे. विमानाच्या आकाराचा हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ येऊ शकतो. त्याचे नाव अॅस्टेरॉईड 2022 व्हीएमटू असे आहे.
'संभाव्य धोकादायक' श्रेणीत या लघुग्रहाचा समावेश करण्यात आला आहे, याचाच अर्थ तो आपल्या पृथ्वीच्या अगदी जवळ येत आहे. 'नासा'च्या रिपोर्टस्नुसार लवकरच हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येईल. त्यानंतर दोघांमधील अंतर 31 लाख किलोमीटर असेल. लघुग्रहाचा आकार 76 फूट असून तो ताशी 13,345 किलोमीटर वेगाने प्रवास करत आहे.
80 लाख किलोमीटरपर्यंत पृथ्वीजवळ येणार्या अशा लघुग्रहांना संभाव्य धोकादायक श्रेणीत ठेवण्यात येते. या लघुग्रहामुळे कोणतीही हानी होणार नसून तो पृथ्वीपासून खूप दूर जाईपर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवले जाणार असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले. हा लघुग्रह 'अपोलो ग्रुप'चा आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच याचा शोध लागला आहे. त्याला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 552 दिवस लागतात. या दरम्यान सूर्य आणि सूर्यामधील कमाल अंतर 244 दशलक्ष किलोमीटर, सर्वात जवळचे अंतर 150 दशलक्ष किलोमीटर आहे. 'नासा' आपल्या सर्व दुर्बिणींच्या मदतीने या लघुग्रहांचा मागोवा घेत आहे.
अलीकडेच 'नासा'ने डार्ट मिशनची यशस्वी चाचणीदेखील केली आहे. ही चाचणी पृथ्वीला भविष्यात लघुग्रहांच्या संभाव्य हल्ल्यापासून वाचवू शकते. ज्याप्रमाणे आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात, त्याचप्रमाणे लघुग्रहदेखील सूर्याभोवती फिरतात. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत तब्बल 11 लाख 13 हजार 527 लघुग्रह शोधले आहेत.