

सातारा : पुढारी वृत्तसेवा
शहरालगत सोनगाव संमत निंब (ता. सातारा) येथे सातारा शहर पोलिसांनी वाळू उपशावर छापा टाकून तब्बल 41 लाख 20 हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक केली आहे. पोलिसांनी बेकायदा वाळू उपसाप्रकरणी ही कारवाई केल्यानंतर खळबळ उडाली आहे.
अनिकेत दिलीप डांगे (वय 21, रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) व जनार्दन जयवंत देसाई (रा. कार्वे, ता. कराड) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील अनिकेत डांगे याला पोलिसांनी अटक केली आहे. जयवंत देसाई हा मालक असल्याची कबुली संशयित डांगे याने पोलिसांना दिली आहे. सातारा शहर पोलिस ठाण्याचे स.पो.नि. चेतन मछले यांना सोनगाव सं. निंब येथील कृष्णा नदीपात्रात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने दि. 24 रोजी छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता वाळूचे उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. यावेळी अनिकेत डांगे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. दुसरीकडे जेसीबी पोकलॅन्ड, दोन चाकी ट्रॅक्टरची हायड्रोलिक ट्रॉली, दुचाकी, वाळूचे ढीग असा मुद्देमाल होता. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला.
पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी महसूल विभागाकडून अधिक माहिती घेतली. यामध्ये वाळूचे बेकायदा उत्खनन होत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी संशयित दोघांविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यातील डांगे याला अटक केली.
जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचे वृत्त दै. 'पुढारी'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर लगेचच पोलिसांनी छापा टाकल्यामुळे जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. परवान्यांची मुदत असतानाच आव्वाच्या सव्वा वाळू उपसा केला आहे. त्यामुळे नदीपात्रांची चाळण झाली आहे. नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा सुरू होता. आता परवानगी संपल्यानंतरही सर्वत्र बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून महसूल प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.