सातारा : सिंचन मंडळात ‘एजंटगिरी’

सातारा : सिंचन मंडळात ‘एजंटगिरी’
Published on
Updated on

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सिंचन मंडळातील पाटकर्‍यांकडून शेतकर्‍यांची प्रचंड आर्थिक पिळवणूक सुरू आहे. पाटकर्‍यांनी लिफ्ट व कृषी पंपांच्या क्षमतेनुसार 'रेट कार्ड' काढले आहे. पाणी परवान्याच्या प्रस्तावांसाठी पाटकरीच गावागावांत जाऊन एजंटगिरी करू लागले आहेत. सातारा सिंचन मंडळात तर पाणी परवान्याच्या फाईलवर ठेवा 'वजन', मगच मिळेल परमिशन अशी परिस्थिती आहे.

जिल्ह्यातील बागायती पट्ट्यात जलसिंचन योजनांचे जाळे विणले गेले असले तरी या योजनांमधील सर्व शेतकरी पाटबंधारेतील अधिकार्‍यांच्या मनमानीने हैराण झाले आहेत. विविध जलसिंचन योजना तयार करताना त्यासाठी पाणी परवान्यांची गरज असते. या पाणी परवान्यांसाठी अर्ज, प्रस्ताव वगैरे सर्व बाबींची पूर्तता करणारे पाटकरी व त्यांनी नेमलेले खासगी कर्मचारी गडगंज झाले आहेत. शेतकरी दरवर्षी पाणीपट्टी भरतात. मात्र, काही पाटकरी शेतकर्‍यांचा अशिक्षितपणाचा गैरफायदा घेतात. भरलेली पाणीपट्टी गेल्यावर्षी असून यावर्षीची थकबाकी असल्याचे बनवेगिरी करुन पाणीपट्टी दोनदा वसूल केली जात आहे.

पाणीपट्टीचे आकडे हे अव्वाच्या सव्वा सांगून उकळाउकळी केली जाते.पाणीपट्टी भरल्याची पावती शेतकर्‍याकडे नसते याचा फायदा घेत पाटकर्‍यांकडून ही वसुली केली जाते. शेतकर्‍यांकडून फॉर्म न भरुन घेताही पाणीपट्टीच्या नावाखाली ही रक्कम खिशात जाते. जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांना पाटकरी फसवत आहेत. पाटकर्‍यांच्या या खाबुगिरीला चाप लावणार कोण?

पाणीपरवान्यासाठीही मोठ्या रक्कमांची मागणी केली जाते. पाटकर्‍यांपासून सर्कलमधील वरिष्ठ अभियंत्यांपर्यत ही साखळी कार्यरत आहे. पाणीपरवान्याची फाईल किंवा प्रस्ताव ज्या-ज्या टेबलावर जाते, त्या प्रत्येक ठिकाणी वजन ठेवल्याशिवाय प्रस्ताव पुढे सरकत नाही. शेतकरी घरातील दागिणे गहाण ठेवून कर्ज काढतो. मोटर पाईपलाईन बसवतो. शेतीची मशागत करतो. लाखोंचे भांडवल गुंतवतात. मात्र जलसिंचन विभागाकडून शेतकर्‍यांचे पाणी परवान्यांचे प्रस्ताव रखडवत ठेवले जातात. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते. कृषी पंपाच्या क्षमतेनुसार पैशाची मागणी केली जाते.

काही निर्ढावलेले पाटकरी शेतकर्‍यांकडे उघड-उघड पैशाची मागणी करत आहेत. पाणी परवाना प्रकरण शेतकर्‍याने स्वत: दाखल करायचे म्हटले तरी पाटकरी त्यांची अडवणूक करतात. सिंचन मंडळात गेलात तरी तुमचे काम पैसे दिल्याशिवाय होणार नाही. तुम्हीही कुणालाही सांगा, फोन करता पण तिथे वशिल्याशिवाय आणि पैशाशिवाय पाणी परवाना लवकर मिळवू शकणार नाही, त्यासाठी पैसे द्यावेच लागणार, त्याशिवाय पाणी परवाना प्रकरण लवकर पुढे सरकणार नाही, अशापध्दतीने पाटकरी उघड उघड बोलत आहेत. खाबुगिरी करण्यासाठी पाटकर्‍यांमध्ये एवढे धाडस येते कुठून? तुमच्या गावातील अमक्याने 15 हजार दिलेत. तुम्ही जवळचे म्हणून 10 हजारात पाणी परवाना घरी आणून देतो, अशी ऑफर काही पाटकरी शेतकर्‍यांना देत आहेत.

जिल्ह्यातील काही तालुक्यांत शेतकर्‍यांकडून पाणी वापर संस्था स्थापन केल्या जातात. त्यासाठी सिंचन मंडळाची परवानगी आवश्यक असते. सार्वजनिक पाणी पुरवठा संस्थांचे पाणी परवाने मिळवण्यासाठी सुमारे 30 ते 40 हजाराहून अधिक मागणी केली जाते. शेतकर्‍यांच्या गटप्रमुखाकडून यासाठी पैसे उकळले जातात. यामध्ये आता गावटगेही सामील होवू लागले आहेत. पाणी परवान्यात प्रचंड आर्थिक पिळवणूक केली जात असून शेतकर्‍यांतून संताप व्यक्त होत आहे.
(क्रमश:)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news