सातारा : सर्वसामान्यांचा ‘घास’ही आता टॅक्सयुक्त

सातारा : सर्वसामान्यांचा ‘घास’ही आता टॅक्सयुक्त
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यानंतर प्रथमच अन्नधान्यावर कर लावण्याचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारने घेतला आहे. अगोदरच महागाईचा आगडोंब उसळला असताना त्यात जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व गोरगरिबांचा 'घास'ही आता टॅक्सयुक्त झाला आहे. दरम्यान, हा जीएसटी केवळ सुट्ट्या वस्तूंवर लागू असल्याने यामध्ये भुर्दंड सोसावा लागणार असल्याने कष्टकरी वर्ग त्रस्त झाला आहे.

महागाईचा आलेख वाढू लागल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यात भर म्हणून की काय आता देशाच्या इतिहासात प्रथमच अन्नधान्य, खाद्य पदार्थांवरही जीएसटी लागू केला आहे. वाढत्या महागाईला आता जीएसटीची फोडणी बसणार असल्याने सर्वसामान्यांचे जगणे महाग झाले आहे. या दरवाढीचा फास सर्वसामान्यांनाच जास्त बसणार असल्याचे चित्र आहे.

पाच वर्षापूर्वी केंद्राने जीएसटी कर प्रणाली आमलात आणली. आतापर्यंत यामध्ये हजारो बदल करण्यात आले आहे. या प्रणालीअंतर्गत सुरूवातीला केवळ चैनीच्या वस्तूंवर अधिक कर लादून जीवनाश्यक वस्तूंना सूट देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, अवघ्या पाचच वर्षात आर्थिक पातळ्यांवर केेंद्र सरकार अपयशी ठरल्याने आता अन्नधान्यावरही जीएसटी लावण्यात आला आहे. 5 टक्के कर आकारल्यामुळे नागरिकांना जेवतानाही आता कर द्यावा लागणार आहे.

मध्यमवर्गीय व कष्टकरी वर्गामधूनच अन्नधान्य व खाद्यपदार्थाची थोडक्या प्रमाणावर खरेदी होत असते. यामध्ये अन्नधान्य, किराणा सामान, दही, पनीर, ताक असे दुग्धजन्य पदार्थ, चिरमुरे गूळ यांसह सर्वच खाद्यपदार्थ्यांवर जीएसटी लागत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गालाही याचा फटका बसणार आहे. कोरोनापूर्वी सर्वसामान्य कुटुंबाचे किचनचे बजेट हे अडीच ते तीन हजारांच्या आसपास होते. मात्र, आता हेच बजेट साडे चार हजारांच्या घरात आहे. आता सिलेंडर, खाद्यतेल, इंधन याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच आता 5 टक्के वाढ झाल्याने आर्थिंक भुर्दंड सोसावा लागणार आहे. महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी ते फारसे प्रभावी नसल्याचेच वास्तव आहे.

रोजंदारीवर असणार्‍यांचे होणार वांदे

आठवडाभर काम करून मिळालेल्या रोजंदारीतून किराणा माल भरणारे लोक हे कमी प्रमाणात अन्नधान्य खरेदी करत असतात. तर धनाढयांकडून अनेक किरणा वस्तूंची बल्कमध्ये खरेदी केली जाते. केंद्राकडूनही हाच भेदभाव केल्याचे दिसून आले आहे. 25 किलो किंवा त्यापुढील वजनाच्या संबंधित वस्तूला जीएसटी लागणार नाही. त्यामुळे बल्कमध्ये खरेदी करणार्‍यांना याचा फारसा फटका बसणार नाही. मात्र, रोजंदारीवर असणार्‍यांचे खायचे वांदे होणार आहेत. तसेच सध्या खरीप हंगाम सुरु झाल्याने पेरणीसाठी खते, बि-बियाणे खरेदी केली जात असल्याने शेतकरी वर्गाला याचा जास्त फटका बसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news