

सातारा : पुढारी वृत्तसेवा : उद्यमशील युवकांना शासनाने आर्थिक पाठबळ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबवण्यात येतो. बँकर्सनी शासनाचा हेतू लक्षात ठेवून फायदेशीर उद्योगांना वेळीच आणि पुरेसे आर्थिक पाठबळ द्यावे. समस्या असतील तर त्या निदर्शनास आणाव्यात परंतु प्रामाणिक आणि होतकरु उद्योजकांना सहकार्याचा हात द्यावा, असे आवाहन खा. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील बँकर्स प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे अग्रणी बँक अधिकारी युवराज पाटील, उद्योग केंद्राचे सातारा जिल्हा जनरल मॅनेजर उमेश दंडगवाळ, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्प संचालक सौ. सुषमा देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी लघु-मध्यम-मोठ्या उद्योगांना वित्तीय पुरवठा करण्याबाबत केलेल्या उद्दिष्टांचा आढावा घेताना खा. उदयनराजे म्हणाले, जिल्ह्यातील अनेक तरुणांमध्ये टॅलेन्ट आणि इनोव्हेटीव्ह कल्पना आहेत. आण्णासाहेब पाटील आणि अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ तसेच उद्योजकता विकास, माविंम, महिला बचत गटांना विविध योजनेव्दारे करण्यात येणारा वित्तीय पुरवठा, जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांचा पुरेपूर लाभ गरजूंना झाला पाहिजे. बँका एखादा वित्तीय मागणीचा प्रस्ताव नॉट व्हायबल म्हणून नाकारतात त्यावेळी त्याची कारणेही त्यांनी सांगायला हवीत. जिल्हा उद्योग केंद्राने अशा प्रस्तावांच्या उद्योगांना मार्गदर्शन केले पाहिजे, असेही ते म्हणाले.
आज जिल्ह्यातील सामान्य व्यक्तीने इलेक्ट्रीक सायकल विकसीत करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. अशा वैशिष्टपूर्ण उत्पादनांसाठी बँकर्सनी सहकार्याचा हात पुढे केला पाहिजे. प्रसंगी सीएसआर निधीचाही शिक्षण आणि प्रशिक्षण याक्षेत्रात वापर केला पाहिजे. शासनाच्या विविध उद्योगविषयक योजनांचा लाभ उद्योजकांपर्यत पोहोचला पाहिजे. जास्तीत जास्त विनंती मागणी अर्जांचा निपटारा करताना आवश्यक ती वित्तीय मंजुरी गतीने दिली गेली पाहिजे.
कोणत्याही परिस्थितीत 31 मार्चपूर्वी बँकांना ठरवून दिलेल्या आणि बँकांनी ठरवून घेतलेल्या उदिष्टांची पूर्ती केली जावी अशाही सूचना खा. उदयनराजेंनी दिल्या. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व सामान्य शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना केंद्र बिंदू मानून होणे ही गरजेचे आहे.उद्योजक घडवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडावी, असेही खा. उदयनराजे म्हणाले.