

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले मित्रमंडळाच्यावतीने तालीम संघाच्या मैदानावर आयोजित केलेल्या दहिहंडीवेळी उदयनराजेंचा जलवा पहायला मिळाला. खचाखच गर्दी, उपस्थित युवकांची जोरदार घोषणाबाजी, संगीताच्या तालावर नाचणारी तरूणाई, लेझर लायटिंगची रोषणाई, गगनभेदी फटाक्यांची आतषबाजी, सातारकरांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद यामुळे खा. उदयनराजेही भावूक झाले. 'कार्ट्यांनो, तुम्हीच माझी कॉलर आहात, 'तुम्हीच माझी फॅमिली', अशा शब्दात राजेंनी तुडूंब गर्दीची मने जिंकली.
तालीम संघाच्या मैदानावर रविवारी रात्री खा. उदयनराजे मित्र मंडळाने दहिहंडीचे आयोजन केले होते. त्यासाठी प्रथम क्रमांकाचे 1 लाख 77 हजार 777 रुपयांचे बक्षिस तसेच गोविंदा पथकांना अन्य भरघोस बक्षीसे ठेवण्यात आली होती. या दहिहंडीचा माहोल रविवारी सकाळपासूनच दिसत होता. दुपारनंतर तालीम संघाच्या मैदानावर दहिहंडीची जोरदार तयारी सुरू झाली.
सायंकाळनंतर युवकांचे जथ्येच्या जथ्ये तालीम संघाच्या मैदानावर दाखल होवू लागले. बघताबघता संपूर्ण मैदान युवा कार्यकर्त्यांनी खचाखच भरून गेले. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचीही गर्दी झाली. मैदानावर लेझर शोमुळे रंगत आली. अत्यंत भारावलेल्या वातावरणातच खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांची एंट्री झाली. त्यांनी आपल्या स्टाईलने स्टेजवर हजेरी लावताच खचाखच गर्दीने त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.त्यामुळे खा. उदयनराजेही भावूक झाले.
तुडूंब भरलेल्या युवकांच्या गर्दीकडे पहात उदयनराजे म्हणाले, ही तर आपलीच सगळी गँग आहे. कार्ट्यांनो, तुम्ही माझी कॉलर आहात. आत्या, मावशी, काका-काकू ही सगळी नाती जन्मताच रेडिमेड मिळतात. पण तुमच्यासारख्यांचं प्रेम मी शब्दात वर्णन करू शकत नाही. माझ्यासाठी तुम्ही फॅमिली आहात. राजेंच्या या भावूकपणाला ओसंडून वाहणार्या गर्दीने चांगलीच दाद दिली. उदयनराजेंच्या जयजयकाराने पुन्हा अवघे आसमंत दणाणून गेले. त्यानंतर राजेंच्या उपस्थितीत गोविंदा पथकांनी दहिहंडी फोडण्यासाठी स्पर्धा सुरू केली.
एक एक गोविंदा पथक थरावर थर रचून दहिहंडी फोडण्यासाठी सरसावले होते. या पथकावर पाण्याचा फवारा व विद्युत रोषणाईचे झोत टाकले जात होते. त्यामुळे गोविंदा पथकांनाही चेव येत होता. रात्री उशीरा गोविंदा पथकांना खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बक्षीसांचे वाटप करण्यात आले.