सातारा : अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सातारा : अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Published on
Updated on

सातारा, पुढारी वृत्तसेवा : खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या आपले सरकार सेवा केंद्रातील रकमा बनावट खात्यात जमा झाल्याचे जिल्हास्तरीय समितीच्या चौकशीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे खटावमधील संगणक परिचालक रियाज पटेल, तालुका व्यवस्थापक विशाल सूर्यवंशी आणि खंडाळ्यातील विनोद साळुंखे या कंत्राटी कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी खटावच्या गटविकास अधिकार्‍यांना दिले. त्यानुसार या तिघांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. दै.'पुढारी'ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यामुळे यंत्रणेला कारवाई करणे भाग पडले.

खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी जमा केलेले आपले सरकार सेवा केंद्र मोबदल्याच्या अग्रीम रकमेमध्ये 45 लाख 66 हजार 438 रुपयांची तफावत असल्याचे आढळून आले होते. हा अपहार सर्वप्रथम दै. 'पुढारी'ने समोर आणला होता. यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. याची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी प्रत्येक तालुका आणि जिल्हा स्तरावर चौकशी समिती नेमली. यामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या रेकॉर्डची तपासणी केली.

खटावमध्ये हा अपहार झाल्यामुळे चौकशी समितीने याच तालुक्यात फोकस केला. चौकशी समित्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार माण व खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या अग्रीम रकमा शासकीय खात्याव्यतिरिक्त इतर अनधिकृत खात्यावर वर्ग झाल्याचे दिसून येत आहे. यावर जिल्हास्तरीय चौकशी समितीने अहवाल व पुरावे पाहून अंतिम अहवाल सादर केला. यानुसार खटाव तालुक्यात आपले सरकार सेवा केंद्र या नावाचे आयडीबीआय बँकेमध्ये अनधिकृत खाते रियाज जलालुद्दीन पटेल यांचे कागदपत्र जोडून खाते उघडल्याचे निदर्शनास आले. तर अनधिकृत खात्यात ग्रामपंचायतींची रक्कम वर्ग झाल्यानंतरही तालुका व्यवस्थापक विशाल उत्तम सुर्यवंशी यांनीही पटेल याला साथ दिली. 39 ग्रामपंचायतींनी 54 वेळा व्यवहार करून जमा केलेली 42 लाख 37 हजार 177 रूपयांची रक्कम अनाधिकृत खात्यावर वर्ग झाली. या खात्यातून ही रक्कम वेळोवेळी काढण्यात आली. ही रक्कम 45 लाख 13 हजार 888 रुपये असल्याचे अहवालात म्हटले आहे.

याचबरोबर खटाव तालुक्यातील 3 ग्रामपंचायतीची 2 लाख 80 हजार 637 रुपये खंडाळा तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र या नावाने आयडीबाय बँक, वाठार बु. या अनाधिकृत खात्यावर वर्ग झाल्याचे दिसून आले आहे. याचा वापर विनोद भानुदास साळुंखे याने केला आहे. काही कालावधीनंतर ही रक्कम होळीचागाव, भुषणगड, येलमारवाडी या ग्रामपंचायतीच्या खात्यावर परत जमा झाली. यामध्ये विनोद साळुंखे याने अपहार केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच जिल्हास्तरीय चौकशी समितीने माण तालुक्यातील विरळी व मार्डी ग्रामपंचायतीमधील 48 हजार 624 रुपये रियाज पटेल याने अनाधिकृत खात्यात वर्ग केले आहेत.

या अहवालावरून रियाज जलालुद्दीन पटेल व विशाल उत्तम सुर्यवंशी यांनी 42 लाख 85 हजार 801 तर विनोद भानुदास साळुंखे यांनी 48 हजार 624 रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळेच मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी या तिघांना सेवेतून कमी करून त्यांच्यावर फसवणूक, अपहार, कागदपत्रामध्ये खडाखोड अशा विविध कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश गटविकास अधिकार्‍यांना दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news