

गेल्या हंगामातील बंपर साखर उत्पादनामुळे साखर धंदा संकटात जाण्याचा धोका होता. मात्र, इथेनॉलनिर्मिती आणि जागतिक पातळीवरील साखरेचे घटलेले उत्पादन यामुळे हे संकट टळले. सहकारी साखर कारखानदारीचा त्याचबरोबर महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा यातील वाटा मोठा आहेच, तसेच देशभरातील साखरधंद्यातही महाराष्ट्राने बाजी मारली.
यंदाचा (2022-2023) ऊस गळीत हंगाम नुकताच सुरू झाला आहे. परतीचा पाऊस लांबल्याने हा हंगाम दिवाळीनंतर सुरू झाला आणि आता स्थिरावरला आहे. गेल्या वर्षीचा साखर उत्पादनाचा उच्चांक राखण्याबरोबरच अनेक पातळ्यांवरील आव्हानांना साखर धंद्याला सामोरे जावे लागेल. साखरेच्या किमतीवर परिणाम करणारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ प्रत्येकवेळी साथ देईल असे नाही. केंद्र सरकारची धोरणे, इथेनॉल धोरण, साखरेचा निर्यात कोटा आणि उसाचे उत्पादन या गोष्टी त्यावर परिणाम करीत असतात. अर्थात, चालू हंगामातही सकारात्मक चित्र राहील, अशी आशा आहे.
गतवर्षी (2021-22) मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादन होऊनही इथेनॉलसाठी वळवलेली साखर व निर्यात झालेली साखर, यामुळे गेल्यावर्षीचा हंगाम कारखान्यांना सुखकारक गेला. शेतकरी आणि साखर कारखान्यांसाठी गेला हंगाम अभूतपूर्वक झाला. देशाबरोबर राज्यातदेखील बंपर साखर उत्पादन झाले. देशात सुमारे 360 लाख मे. टन साखर उत्पादन झाले. शिवाय 34 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली गेली. राज्यामध्ये 137.2 लाख मेट्रिक टन साखर तयार झाली. साधारणपणे 11 लाख टन साखर इथेनॉलसाठी वापरली गेली. सुमारे 1320 लाख मेट्रिक टन ऊस गळितासाठी उपलब्ध होता. त्यातून इथेनॉलकडे वळवलेली 11 लाख टन साखर वगळता 137.2 लाख टन इतके मोठ्या प्रमाणावर साखरेचे उत्पादन झाले आणि हे उत्पादन देशामध्ये उच्चांकी असून, आपण उत्तर प्रदेशला साखर उत्पादनामध्ये मागे टाकलेले आहे. राज्याचा सरासरी उतारा 10.40 टक्के आणि सरासरी हंगाम 173 दिवस राहिला. सरासरी उतारा समाधानकारक तर होताच, शिवाय अन्य राज्यांच्या तुलनेत तो चांगला होता. राज्यातील उत्तम ऊसशेतीचे ते निदर्शक म्हणावे लागेल.
चालू हंगामाची आपण गत हंगामाशी तुलना केली तर गत हंगामामध्ये 1013 लाख मेट्रिक टन गाळप होऊन 106.4 लाख टन साखर झाली होती. 140 दिवसांचा हंगाम चालला आणि 10.50 साखर उतारा मिळाला आणि हंगाम 2021-22 मध्ये 101 सहकारी आणि 99 खासगी असे 200 कारखाने चालले. 94 सहकारी आणि 96 खासगी असे 190 कारखाने सुरू होते. एकंदर ऊस गाळपाचा आढावा घेतला तर 200 कारखान्यांमध्ये जवळजवळ 50 टक्के कारखाने खासगी असून, त्यांचा वाटा लक्षणीय आहे. तसेच हंगामामध्ये कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या साखरपट्ट्यात फार मोठ्या अडचणी आलेल्या नाहीत. या उलट, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड विभागातील हंगाम खूप लांबला. तो 15 जूनपर्यंत चालला. याचे कारण तेथे जेवढा ऊस आणि कारखान्यांची गाळप क्षमता याचा विचार करता, 150 ते 160 दिवसांत इतका ऊस गाळप होऊन शकला नसता. उन्हाळ्यात तोडणी मजुरांची अडचण झाली. गाळपावर परिणाम झाला. राज्यातील इतर विभागांची मदत घ्यावी लागली आणि 15 जूनला हा हंगाम संपला. विनागाळप ऊस शिल्लक राहिला नाही, हीसुद्धा मोठी दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणावी लागेल.
शंभर सहकारी साखर कारखान्यांनी चार लाख 17 हजार 200 मेट्रिक टन दैनंदिन गाळप क्षमतेचा वापर करून सुमारे 74.65 लाख टन साखर उत्पादित केली. या उलट खासगी 99 कारखान्यांनी 3 लाख 84 हजार 100 मेट्रिक टन दैनंदिन गाळप करीत क्षमतेचा पूर्ण वापर करून 62.62 लाख टन साखर उत्पादन केले. सहकारी कारखानदारीतून 55.40 टक्के, तर खासगी कारखानदारीतून 45.60 टक्के इतर साखर तयार झाली. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी सहकारासाठी ओळखली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये सहकारी कारखानदारीच्या जोडीला खासगी कारखानदारी आली असून, त्यांच्यामुळेही राज्याची साखर उत्पादन क्षमता वाढलेली आहे. आधुनिकीकरण, गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर हे कारखानेही चांगल्या उतार्यासह साखर उत्पादन घेताना दिसतात. खासगी कारखानदारी स्थिरावल्याचे ते लक्षण आहे. येत्या काळात सहकारी साखर कारखानदारीशी स्पर्धा होऊ शकेल, असे आजवरच्या वाटचालीवरून दिसते.
मागील हंगामाची वैशिष्ट्ये
ब—ाझीलमध्ये दुष्काळ पडला होता. पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढल्यामुळे तेथील कारखान्यांनी इथेनॉल उत्पादन घेतले. त्यामुळे तिथे साखरनिर्मिती कमी झाली. जागतिक बाजारपेठेमध्ये साखर गरजेपेक्षा कमी उत्पादित होऊन साखरेचा तुटवडा निर्माण होणार होता. या संधीचा फायदा घेऊन भारतातील साखर कारखान्यांनी पर्यायाने महाराष्ट्राला साखर निर्यात करण्याची मोठी संधी मिळाली. त्यामुळे गतवर्षीच्या हंगामात केंद्र शासनाने खुल्या निर्यातीला परवानगी दिल्यामुळे लक्षणीय 112 लाख मेट्रिक टन साखर आपल्या देशातून निर्यात झाली. विशेष बाब म्हणजे यापैकी 70 लाख टन एवढी साखर महाराष्ट्रातून निर्यात झाली.
या साखरेला चांगला दर मिळाल्यामुळे ती शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय निर्यात करता आली. यामुळे कारखानदारीला संभाव्य आर्थिक अडचणीतून बाहेर पडता आले आणि शेतकर्यांना एफआरपी वेळेत देता आली. इथेनॉल विक्रीतूनही सुमारे 6000 कोटी इतके उत्पन्न कारखान्यांना मिळाले. तसेच 122 कारखान्यांनी 665 कोटी युनिटस् वीज निर्माण झाली. यापैकी 382 कोटी युनिटस् महावितरणला विक्री झाली. यातून कारखान्यांना 2428 कोटी उत्पन्न मिळाले.
हंगाम 2021-22 चा आढावा पाहता उत्पादित साखरेतील 50 टक्क्यांपेक्षा साखर निर्यात झाली. इथेनॉलसाठी 11 लाख टन साखर वापरली गेली. यामुळे मोठ्या प्रमाणावर साखर उत्पादित होऊनही अतिरिक्त साखर साठ्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. यामुळे साखर कारखानदारी आर्थिक आरिष्ट्यातून काही प्रमाणात बाहेर पडली. या जमेच्या बाजू लक्षात घेता यावर्षी नव्या आव्हानांना सामोरे जाताना साखर उत्पादन, साखर उतारा आणि शेतकर्यांना देण्यात येणारा दर या आघाड्यांवर कारखान्यांना सातत्यपूर्ण काम करावे लागणार आहे.
– विजय औताडे
निवृत्त कार्यकारी संचालक