

सांगली ; पुढारी वृत्तसेवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली-कोल्हापूर आणि सांगली-इस्लामपूरसह अनेक मार्गावर जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन केले. अंकली टोल नाक्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या रस्तारोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
50 खोके घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करू नये. नेमकी स्टंटबाजी कोण करते हे पुढील काळात कळेल असा टोला मंत्री उदय सामंत यांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (बुधवार) राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. अंकली फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
रस्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कोणताही त्रास न करता हे आंदोलन करण्यात आले. वीज तोडणी, ऊस तोडणी मुकादमाकडून होणारी फसवणूक थांबवावी, एक रकमी एफआरपी अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान टीका करणाऱ्या मंत्री उदय सामंत यांच्यावर शेट्टी यांनी पलटवार केला. 50 खोके घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर टीका करू नये. नेमकी स्टंटबाजी कोण करते हे पुढील काळात कळेल, असा टोला मंत्री उदय सामंत यांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास विधानभवनावर धडक देण्याचा इशाराही खा. शेट्टी यांनी दिला आहे. भर दुपारी 12 वाजता रास्तारोको करण्यात आल्याने वाहनधारकांना याची धग सोसावी लागली. दोन्ही बाजूला एक ते दीड किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
हेही वाचा :