

सांगली : पुढारी वृत्तसेवा
मुंबईतील मार्केटिंग फर्मचे स्टॉकिस्ट व डिस्ट्रीब्युटर्स नेमण्याच्या आमिषाने अनिलकुमार ज्ञानदेव सावंत या शिक्षकांना 37 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. दि. 17 जानेवारी 2018 ते दि. 22 नोव्हेंबर 2019 दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फसवणूकप्रकरणी महेश मार्केटिंग फर्म (कोळसेवाडी, कल्याण ईस्ट, मुंबई), महेश मार्केटिंग फर्मतर्फे प्रोपायटर हरिश्चंद्र गणपती जाधव (वय 35, रा. कोळसेवाडी) आणि सान्वी हरिश्चंद्र जाधव (वय 30, रा. गणेशनगर, कल्याण ईस्ट, मुंबई) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : संशयितांनी महेश मार्केटिंग फर्मसाठी स्टॉकिस्ट व डिस्ट्रीब्युटर्स नेमण्यात येणार असल्याचे सांगून सावंत यांच्याकडून वेळोवेळी रोख स्वरुपात आणि बँक खात्यावरून 37 लाख 50 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर संशयितांनी सावंत यांना वेगवेगळी कारणे सांगून डिस्ट्रीब्युटर्सशीप मिळणार नाही, असे सांगितले.
सावंत यांनी संशयितांना पैसे परत देण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी धनादेश दिले. मात्र, ते वटले नाहीत. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
विश्रामबागमध्ये दुचाकी लंपास
विश्रामबाग येथून अब्बास खुदबुद्दीन मुलाणी यांची 20 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल अज्ञाताने लंपास केली. याबाबत त्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.